Mumbai Rain Update: नालेसफाईसंदर्भातील धोरण मुंबई महापालिकेनं जाहीर करावं- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 01:38 PM2019-07-02T13:38:57+5:302019-07-02T13:41:28+5:30
गेल्या 40 वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस बरसला
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मुंबईत कोसळलेल्या मुसळधार परिस्थितीची माहिती दिली, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही मुख्यमंत्री उत्तर दिली आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या 40 वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस बरसला आहे, महिनाभराचा पाऊस तीन दिवसांत पडला असून, 1974नंतर दुसऱ्यांदा एवढा मोठा कोसळला, जून महिन्यातील पावसाची सरासरी 3 दिवसांत पूर्ण झाली आहे. मुंबईत पाणी तुंबलं हे मान्य, पण महापालिकेनं केलेल्या उपाययोजनांमुळे लवकरच मुंबईत तुंबलेलं पाणी कमी झालं.
भरतीच्या वेळी पाऊस जोरात असल्यानं मुंबईत पाणी तुंबतंच, पाच पंपिंग स्टेशन पूर्ण झाले आहेत. पंपिंग स्टेशनच्या जागेपासून परवानगीपर्यंत अनेक अडचणी होत्या. अनेक ठिकाणी या परवानग्या घेण्यासाठी कोर्टात जावं लागतं. माहुल आणि आणखी एक जागा या ठिकाणी पंपिंग स्टेशन झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. पंपिंग स्टेशनच्या या दोन्ही जागा महापालिकेच्या अखत्यारित आल्या आहेत. लवकरच तिथे पंपिंग स्टेशनचं काम सुरू होईल, पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून तुंबलेलं पाणी कमी करता येईल. मिठी नदीवरील अतिक्रमण हटवण्यात आलं आहे.
महापालिकेनं नाल्यांवर आलेली बांधकामं काढण्याचं काम चांगल्या पद्धतीनं हाती घेतलं होतं. झोपडपट्टी न हटवता नाल्याजवळील झोपड्या हटवण्याचा आम्ही निर्णय घेतला. मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण असून, झोपडपट्ट्या तयार झाल्या आहेत. तीन आणि चार मजल्यांच्या झोपडपट्ट्या तयार झाल्या आहेत. त्यांच्याही जीविताला धोका आहे आणि तरही लोकांना त्याचा धोका आहे. यासंदर्भात महापालिकेला कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्याची मुभा दिलेली आहे.
पावसासंदर्भात तीन वर्षांचा डेटा आहे. त्यानुसार कारवाई आणि उपाययोजना केल्या जात आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांना शासनाच्या वतीनं 5 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच पालिकेनं त्यांना पाच लाख रुपये द्यावेत अशी विनंती केली आहे. जखमींच्या संपूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल. टेकड्यांच्या भागात महापालिकेनं सर्व्हे करावा आणि अपघातप्रवण क्षेत्रातील लोकांना पुनर्वसन करावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.