नालेसफाईचे यंदाही वाजले बारा!
By admin | Published: April 20, 2017 03:07 AM2017-04-20T03:07:10+5:302017-04-20T03:07:10+5:30
नालेसफाई घोटाळ्यात अधिकारी व ठेकेदारांना जेलची हवा खावी लागल्याने, या कामासाठी ठेकेदार मिळेनासे झाले आहेत. बरीच शोधाशोध केल्यानंतर
मुंबई: नालेसफाई घोटाळ्यात अधिकारी व ठेकेदारांना जेलची हवा खावी लागल्याने, या कामासाठी ठेकेदार मिळेनासे झाले आहेत. बरीच शोधाशोध केल्यानंतर, मोठ्या नाल्यांसाठी आता ठेकेदार मिळालेत. त्यामुळे २० दिवस उशिराने मोठ्या नाल्यांची सफाई सुरू होणार आहे. मात्र, छोट्या नाल्यांसाठी ठेकेदार नेमण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत तीन वेळा फसला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाचे बारा वाजले असून, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होण्याचा धोका आहे.
नाल्यांमध्ये कचरा साठून राहिल्यास पावसात नाले तुंबून मुंबई पाण्याखाली जाते. त्यामुळे २६ जुलै २००५च्या पुरानंतर पावसाळीपूर्व कामांमध्ये नालेसफाई प्राधान्याने केली जाते. मात्र, दोन वर्षांपूर्वी नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उजेडात आले. या प्रकरणी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. काहींना तुरुंगाची हवाही खावी लागली, तर नालेसफाईच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाईही सुरू आहे. यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले असून, नालेसफाईसाठी कोणी पुढे येईनासे झाले आहेत.
पालिकेच्या नियमानुसार, पावसाळ्यापूर्वी ६० टक्के नालेसफाई पूर्ण करण्यात येते, तर पावसाळ्यात २० आणि पावसाळ्यानंतर २० टक्के असा शंभर टक्के गाळ काढण्यात येतो. मात्र, १ एप्रिलपासून सुरू होणारी नालेसफाई यंदा एप्रिल महिना संपत आला, तरी सुरू झालेली नाही. ठेकेदार नेमण्याचा प्रस्ताव आज अखेर स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने मंजुरीसाठी आणला होता. मात्र, उद्या कामाला सुरुवात झाली, तरी या विलंबामुळे ३१ मे ार्यंत नालेसफाई पूर्ण होणे अशक्य असल्याची नाराजी स्थायी समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
मिठी नदीमधील धारावी पुलापासून प्रेमनगर आउटफॉलपर्यंतचा गाळ पावसाळ्याआधी काढण्यासाठी, मे. एस. एन. बी. इन्फ्रास्ट्रक्चर यांना साडेतीन कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता.
मात्र, हा प्रस्ताव तहकूब करावा की दफ्तरी दाखल करावा, यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपली होती. त्यामुळे या वादात मिठी नदीच्या सफाईचा प्रस्ताव रखडला होता. त्यालाही आता सुरुवात होऊ शकेल.
या नाल्यांच्या सफाईचे टेन्शन
वाकोला नदी, खेरवाडी नाला, मोगरा नाला, जोगेश्वरीचा मजास नाला आणि शहर भागातील काही मोठ्या नाल्याची सफाई प्राधान्याने केली जाते. मात्र, १ एप्रिल रोजी ही सफाई सुरू झालेली नाही. प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजूर झाला, तरी प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम एक आठवड्याने सुरू होईल. त्यामुळे डेडलाइनमध्ये काम पूर्ण होण्याबाबत नगरसेवकांकडून शंका व्यक्त होत आहे.
नियमानुसार, पावसाळ्यापूर्वी ६० टक्के नालेसफाई पूर्ण करण्यात येते, तर पावसाळ्यात २० आणि पावसाळ्यानंतर २० टक्के असा शंभर टक्के गाळ काढण्यात येतो. मात्र, १ एप्रिलपासून सुरू होणारी नालेसफाई यंदा एप्रिल महिना संपत आला, तरी सुरू झालेली नाही.
गाळ टाकणार कुठे?
कंत्राटदारांनी स्वत: गाळ काढणे, जमा करणे, जमा केलेला गाळ डंपरद्वारे वाहून नेणे पालिकेच्या हद्दीबाहेर कंत्राटदाराने निश्चित केलेल्या क्षेपणभूमीवर टाकणे या सर्व कामांचा समावेश करून, कंत्राटाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. मात्र, नालेसफाई करून गाळ कुठे टाकणार? याचा उल्लेख प्रस्तावात नाही. त्यामुळे गाळ टाकण्यावरून पुन्हा वादाला तोंड फुटणार आहे. याबाबतची नाराजी नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे.
छोट्या नाल्यांची सफाई रामभरोसे
बऱ्याच प्रयत्नांनंतर मोठ्या नाल्यांची सफाई सुरू होत आहे. मात्र, छोट्या नाल्यांसाठी ठेकेदार शोधण्याचे प्रयत्न तीन वेळा फेल गेले. अखेर पालिकेने निविदेतील अटी व शर्ती शिथिल केल्या, तरी ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामाकडे पाठ फिरवल्याने पालिकेची पंचाईत झाली आहे. त्यामुळे ठेकेदार मिळेपर्यंत घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत रस्त्यालगतचे पर्जन्य जलवाहिन्या साफ करणाऱ्या ठेकेदारांकडून छोट्या नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.