मुंबई : ऐन पावसाळ्यात नाले तुंबून मुंबईतील परिसर जलमय होऊ नये, म्हणून महापालिका प्रशासन आणि नेते नालेसफाईचे दौरे करत आहेत. मात्र या नालेसफाईच्या मुद्द्यावर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीत सध्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांनी बुधवारी पश्चिम उपनगरात नालेसफाई सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. पश्चिम उपनगरांतील दहिसर नदी, पोयसर नदी, ओशिवरा, पिरामल नाला, मोगरा नाला व नेहरू नगर नाला येथे सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त उपस्थित होते.दुसरीकडे मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनीही बुधवारी पूर्व उपनगरातील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी उपमहापौर अलका केरकर यांच्यासह पालिका गटनेते मनोज कोटक उपस्थित होते. या वेळी शेलार यांनी महापालिका प्रशासनावर नालेसफाईवरून टीका केली. पालिका प्रशासन काय म्हणते? १५ एप्रिलपासून पालिका हद्दीत पावसाळी नालेसफाई करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे ६५ टक्के नालेसफाई झाली आहे. ३१ मेपर्यंत पावसाळ्यातील निर्धारित ७० टक्के नालेसफाईचे उद्दिष्ट गाठले जाईल. गेल्या वर्षी नालेसफाईसाठी ४० कंत्राटदार नेमण्यात आले होते, तर यंदा ही संख्या ५० इतकी आहे. सुमारे ३४० किलोमीटर लांबीचे मोठे नाले आणि सुमारे ४५० किलोमीटर लांबीचे लहान नाले यांची सफाई होत आहे (प्रतिनिधी) विविध प्राधिकरणांशी तसेच महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या इतर महापालिकांशीही समन्वय साधला जात आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि मुंबईकरांना पूरस्थितीसदृश कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून नालेसफाईची कामे योग्यरीत्या सुरू आहेत. आतापर्यंत ६५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहे. - स्नेहल आंबेकर, महापौरया कामाचे नियोजन प्रशासनाने योग्य पद्धतीने केले असले तरी कंत्राटदार गाळ काढून जी आकडेवारी सांगत आहेत, त्याची सत्यता त्यांच्या गाळ मोजण्याच्या काट्यावर अवलंबून आहे. यासंबंधीच्या पावत्या उपलब्ध न होणे यातून शंका घ्यावी, अशी परिस्थिती आहे. कंत्राटदारांची कामे पारदर्शक नाहीत.- आ. आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष, भाजपा
नालेसफाईवरून सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा!
By admin | Published: May 21, 2015 1:09 AM