Join us

नालेसफाईची झाडाझडती

By admin | Published: May 19, 2017 3:36 AM

प्रत्येक पावसाळ्यात मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे सेवा कोलमडते. रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईच्या अनेक तक्रारी असतात. त्यामुळे पालिका आयुक्त

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रत्येक पावसाळ्यात मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे सेवा कोलमडते. रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईच्या अनेक तक्रारी असतात. त्यामुळे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी गुरुवारी रेल्वेच्या नालेसफाईची तपासणी केली. या पाहणी दौऱ्यात हार्बर मार्गावरील नालेसफाईची पाहणी केली.रेल्वेच्या हद्दीत असणाऱ्या छोट्या पुलांच्या खालील नाल्यांच्या सफाईचे काम रेल्वेमार्फत करण्यात येते. मात्र या कामासाठी महापालिका रेल्वेला पैसे देत असते. या वर्षीच्या नालेसफाईसाठी महापालिकेने मध्य रेल्वेला २ कोटी ७९ लाख रुपये दिले आहेत. मध्य रेल्वेमार्फत हार्बर मार्गावर सुरू असलेल्या या कामाची संयुक्त पाहणी गुरुवारी करण्यात आली. यासाठी रेल्वेच्या टॉवर वॅगनमधून प्रवास करून हार्बर मार्गाच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी आयुक्तांनी केली.या दौऱ्यात आयुक्तांबरोबर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे स्थानक या दरम्यान हार्बर मार्गावर मध्य रेल्वेद्वारे करण्यात येत असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी त्यांनी केली. नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच करण्याची सूचना आयुक्तांनी या वेळी केली.- बी विभागातील मशीद बंदर - सँडहर्स्ट रोड; एफ उत्तर विभागातील वडाळा ते गुरु तेग बहादुर नगर, गुरु तेग बहादुर नगर ते चुनाभट्टी आणि एम पूर्व विभागातील चेंबूर ते गोवंडी, गोवंडी ते मानखुर्द या दरम्यानच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईच्या कामांची प्रामुख्याने पाहणी करण्यात आली.- रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईसाठी ४ कोटी १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये २ कोटी ७९ लाख रुपये मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेला नालेसफाईसाठी देण्यात आले आहेत.- उर्वरित सर्व रक्कम पश्चिम उपनगरात रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईसाठी देण्यात येणार आहे.पालिका आयुक्तांसह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी रेल्वे हद्दीतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. हार्बर लाइनवरील नालेसफाई कामांच्या पाहणी दौऱ्यात प्राथमिक अवस्थेत आयुक्त आणि महाव्यवस्थापक यांनी समाधन व्यक्त केले आहे. नालेसफाईचा विषय गुंतागुंतीचा असल्याने तूर्तास यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. लवकरच रेल्वे हद्दीतील सर्वच नाल्यांची पाहणी करण्यात येणार आहे.- नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे