नालेसफाईची कामे पडली लांबणीवर

By admin | Published: May 12, 2016 03:11 AM2016-05-12T03:11:43+5:302016-05-12T03:11:43+5:30

नाल्यांच्या सफाईतून ठेकेदारांनी पालिकेच्या तिजोरीची सफाई केल्यानंतरही प्रशासनाला अद्याप शहाणपण आलेले नाही़ यंदाही गाळ टाकण्याच्या जागेचा पत्ता नसताना ठेकेदारांना कोट्यवधी

Nalasefi's work was postponed | नालेसफाईची कामे पडली लांबणीवर

नालेसफाईची कामे पडली लांबणीवर

Next

मुंबई : नाल्यांच्या सफाईतून ठेकेदारांनी पालिकेच्या तिजोरीची सफाई केल्यानंतरही प्रशासनाला अद्याप शहाणपण आलेले नाही़ यंदाही गाळ टाकण्याच्या जागेचा पत्ता नसताना ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे, मात्र स्थायी समितीने यास विरोध करीत हा प्रस्ताव राखून ठेवला़ त्यामुळे शहर भागातील नालेसफाईची कामे टांगणीवर पडली आहेत.
नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी पालिकेकडे जागा नसल्याने ही जबाबदारी ठेकेदारांवर सोपविण्यात आली आहे़ मात्र ठेकेदारांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे गेल्यावर्षी चौकशीतून उजेडात आले़ सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या या घोटाळ्यानंतर पालिकेने ठेकेदारांवर कारवाई केली़ यामुळे नवीन ठेकेदार मिळण्यास अडचणी निर्माण
झाल्या़ अखेर काही ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात झाली़
शहर भागातील नाल्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज प्रशासनाने मांडला़ मात्र नाल्यांतून काढलेला गाळ ठेकेदार कुठे टाकणार, याबाबत प्रशासनच अनभिज्ञ आहे़ याबाबत माहिती विचारल्यावर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख निरुत्तर
होते़ पुढच्या बैठकीत माहिती
देण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ परंतु हा प्रस्ताव रेंगाळल्यामुळे शहर भागातील नाल्यांची सफाई
आणखी लांबणीवर पडली आहे़ (प्रतिनिधी)
> मुंबईत मोठे व छोटे नाले तसेच नदींची एकूण लांबी ६५० कि़मी़ आहे़ यापैकी शहरात १०९ कि़मी़, पूर्व उपनगरांमध्ये २३० कि़मी़ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३११ कि़मी़ लांबीचे नाले आहे़
२०१६ ते २०१८ पर्यंत असे दोन वर्षांचे शहर भागातील नालेसफाईचे कंत्राट देण्यात येणार आहे़ यासाठी १२ कोटी ७५ लाख रुपये राखून ठेवण्यात आले आहे़
> नालेसफाईचा गाळ टाकण्यासाठी मुंबईबाहेरील ग्रामपंचायतीचे बोगस ना हरकत प्रमाणपत्र देऊन ठेकेदारांनी पालिकेला फसवले़ हा घोटाळा उघड झाल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली़

Web Title: Nalasefi's work was postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.