वडाळ्यातील नालेसफाई संथ गतीने
By admin | Published: May 18, 2017 03:31 AM2017-05-18T03:31:06+5:302017-05-18T03:31:06+5:30
वडाळा येथील कोरबा मिठागरमधील खारूल नाला हा गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरला आहे. या परिसरातील नालेसफाई अत्यंत संथ गतीने होत असल्याचे कोरबा मिठागरमधील
- अक्षय चोरगे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडाळा येथील कोरबा मिठागरमधील खारूल नाला हा गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरला आहे. या परिसरातील नालेसफाई अत्यंत संथ गतीने होत असल्याचे कोरबा मिठागरमधील नागरिकांनी सांगितले. नालेसफाई सुरू केल्यानंतर, हा नाला साफ करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून फक्त तीन-चार कर्मचारी येत आहेत. अशा गतीने जर नालेसफाई होत राहिली, तर पावसाळा येईपर्यंत २० टक्के नालेसफाईसुद्धा होणार नाही आणि त्यामुळे पावसाळ्यात नाला तुंबणार, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे आहे, परंतु वडाळ्यातील नालेसफाई ज्या गतीने केली जात आहे, ते पाहून स्थानिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नालेसफाई वेळेवर झाली नाही, तर त्याचा मोठा फटका नाल्याच्या दोन्ही काठावर वसलेल्या आदर्शनगर आणि माता रमाबाईनगरमधील झोपड्यांना बसणार आहे. नाला तुंबलेला असल्यामुळे झोपड्यांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वी खारूल नाला खूप रुंद होता. मात्र, गेल्या काही वर्षांत पालिकेच्या दुर्लक्षामुळे नाल्यालगत भराव टाकत झोपड्या बांधण्यात आल्या. परिणामी, नाला अरुंद झाला.
नाला साफ करणारी मोठी यंत्रे नाल्यात उतरवता येत नाहीत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
- आमच्याकडे अनेक वेळा नालेसफाईसंदर्भात तक्रारी आल्या. त्यानंतर, संबधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. कोरबा मिठागरसह आसपासच्या परिसरातील नालेसफाईची कामे सामाजिक सेवाभावी संस्थेकडे सोपविण्यात आली आहेत, अशी माहिती एफ/नॉर्थच्या तक्रार अधिकारी पारखी यांनी दिली.
- कोरबा मिठागर परिसरात खूपच कमी कचरापेट्या आहेत, तसेच काही कचरापेट्या झोपड्यांपासून खूप लांब असल्यामुळे, आदर्शनगर आणि माता रमाबाईनगरमधील नागरिक त्यांच्या घरातील कचरा नाल्यात फेकतात. नाल्याच्या काठावरील झोपड्यांमधील नागरिकसुद्धा कचरा कचरापेटीत न टाकता नाल्यात फेकतात. त्यामुळे नाला भरला आहे.
- पालिकेचे जे कर्मचारी कोरबा मिठागर परिसरातील छोट्या नाल्यांची सफाई करत आहेत, ते कर्मचारी छोट्या नाल्यांमधील कचरा खारूल नाल्यात टाकत आहेत. त्यामुळे खारूल नाल्याची सफाई होण्याऐवजी नाला अधिक भरत आहे.
गेल्या पाच वर्षात या विभागात नालेसफाई झाली नाही. त्यामुळे कचरा साफ करायला थोडा अवधी लागेलच. तरिही येत्या पंधरा दिवसात नालेसफाई पुर्ण करण्याचा प्रयत्न करू. नाल्याची रुंदी कमी झाल्याने सफाईत अडथळा येत आहे. मात्र, तरीही सफाईचा प्रयत्न केला जाईल आणि येत्या काही दिवसांत कोरबा मिठागरसह आसपासच्या परिसरात नव्या कचराकुंड्या बसवण्यात येतील.
- पुष्पा कोळी,
स्थानिक नगरसेविका