लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे पालिका प्रशासन नालेसफाईच्या आकड्यांचा फुगा फुगवत असताना, विरोधी पक्षांनी त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. नालेसफाईच्या नावाखाली शिवसेना-भाजपाची हातसफाई सुरू आहे. प्रत्यक्षात २५ टक्केच नालेसफाई झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होणार, असा आरोप विरोधी पक्षाने आज पाहणी दौऱ्यानंतर केला.पावसाळीपूर्व काम पूर्ण करण्यासाठी डेडलाइन दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नालेसफाईसाठी उशिरा मिळालेले ठेकेदार आणि खडीअभावी रस्त्यांची कामे रखडली, तरी कामे दिलेल्या मुदतीतच होणार, असे पालिका अधिकारी छातीठोकपणे सांगत आहेत. त्यांच्या दाव्यांची शहनिशा करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संयज निरुपम, पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी वडाळा आणि गोवंडी येथील नाल्यांची आज पाहणी केली. या पाहणीनंतर काँगे्रसने प्रशासनाच्या दाव्यातील हवाच काढून घेतली.मुंबईतील सर्व नाल्यांच्या सफाईसाठी १२० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, २५ टक्के च काम पूर्ण झाले आहे. पुढच्या आठवड्यात मुंबईत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला या वर्षी बुडण्यापासून कोणही वाचवू शकणार नाही, असा दावा करीत, शिवसेना-भाजपा केवळ दाखविण्यापुरते वेगळे आहेत. पालिकेत दोघेही गाळाची सफाई नाही, तर हातसफाई करीत आहेत. त्यांची ही ‘हात की सफाई’ बंद झाली नाही, तर मुंबईचे वाटोळे होईल, असा आरोपही निरुपम यांनी केला.असे काही वास्तवनालेसफाईसाठी ठेकेदार मिळत नसल्याने, २५ ते ४३ टक्के जास्त दराने नालेसफाईची कामे देण्यात आली. मोठ्या नाल्यांसाठी १,६०९ रुपये प्रति मॅट्रिक टन दर आहे, तर छोट्या नाल्यांची कामे एनजीओकडून करून घेतली जात आहेत. नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांना कचरा टाकण्यासाठी स्वत:च कचराभूमीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे नक्की किती गाळ आणि तो कुठे टाकला जात आहे? यावर पालिकेचे नियंत्रण नाही. मुंबईबाहेर निश्चित केलेल्या कचराभूमीवर गाळ टाकण्यासाठी जिल्हाधिकारी व प्रदूषण विभागाने परवानगी दिली असल्याचा दावा ठेकेदार करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही परवानगी दाखविण्यात येत नाही. त्यामुळे यातून घोटाळ्याची शक्यता नाकारता येत नाही. या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.नेते दौऱ्यावर, मुंबईकर वाऱ्यावर पावसाळा तोंडावर असून, मुंबईत नालेसफाईचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र, यावर नजर ठेवून ही कामे प्रशासनाकडून करून घेण्यासाठी पालिकेतील शिलेदार हजर नाहीत. मुंबईकर नागरिकांना वाऱ्यावर सोडून शिवसेनेचे नेते युरोपमध्ये फिरत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.नालेसफाईची चौकशी व्हावीनालेसफाई घोटाळ्यात गुंतलेले ठेकेदार दुसऱ्या नावाने कंत्राट मिळवत आहेत. नालेसफाईत या वर्षीही घोटाळा असून, त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, या वेळी सखोल चौकशी करून ठेकेदारांचे कोणत्या अधिकारी आणि नगरसेवकांशी संबंध आहेत हे जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.नियंत्रण कक्षात प्रवेश नाकारलानालेसफाईच्या कामाची पाहाणी केल्यानंतर, रवी राजा आणि निरूपम पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. मात्र,आयुक्त अजय मेहता यांनी निरूपम यांना पाहाणी करण्याची परवानगी दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला.नालेसफाईबाबत प्रशासनाचा दावामोठ्या नाल्यांमधून एक लाख ९१ हजार ६८२ मेट्रिक टन एवढा गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी काढणे अपेक्षित आहे. यापैकी २७ मे २०१७ पर्यंत सुमारे एक लाख ६६ हजार ५२२ टन गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. म्हणजेच नालेसफाईची कामे ८६.८७ टक्के एवढी झाली आहेत.मेट्रो कामामुळे पश्चिम मुंबई तुंबणार मुंबईत पश्चिम उपनगरात अंधेरी ते दहिसरच्या रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यावर खोदकाम केल्याने पावसाळ्यात पाऊस पडल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यात पश्चिम उपनगर पाण्यात बुडणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.हे काय करून दाखवले....निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या घोषणा शिवसेना देते. आता सांगतात, शंभर टक्के नालेसफाई होऊ शकत नाही. हे काय करून दाखवले, असा टोला निरूपम यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.प्रशासनाच्या दाव्यांची हवा काढलीनालेसफाईची कामे ८६ टक्के झाले असून, दिलेल्या मुदतीतच कामे पूर्ण होणार, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांनी आज नाल्यांची पाहणी केली. वडाळा येथील कोरबा नाल्यात कचऱ्याचा ढीग होता. या मोठ्या नाल्याची सफाई जेसीबीऐवजी कामगारांकडूनच करून घेण्यात येत होती, तर गोवंडी येथील रफीकनगर नाल्याची सफाई आजपासून सुरू झाली असल्याचे आरोप, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. छोट्या नाल्यांची सफाई करण्याची जबाबदारी एनजीओच्या कामगारांना दिली आहे. मात्र,त्यांच्यामार्फत सफाईच केली जात नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
नालेसफाईत सत्ताधाऱ्यांची ‘हातसफाई’
By admin | Published: May 30, 2017 6:53 AM