महेश चेमटे/मुंबई, दि.21 - मुंबई शहराला बुधवारी जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. या पावसामुळे रेल्वे व विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मुंबईतील जोरदार पावसाव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकावरील एक्स्प्रेसचीही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. नालासोपारा स्थानकातून जलदगतीनं जाणा-या एक्स्प्रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर बुधवारी तुफान व्हायरल झाला. एक्स्प्रेसचा हा व्हिडीओ सध्या 'नेटिझन्स'च्या चर्चेचा विषय आहे. या व्हिडीओमध्ये, मुंबईत झालेल्या पावसामुळे नालासोपारा स्थानकात रुळावर पाणी साचलेले आहे. मात्र, साचलेल्या पाण्यातूनही मोटरमननं ही एक्स्प्रेस बुलेटप्रमाणे चालवल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटरसह फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर हा व्हि़डीओ 'सुपरफास्ट' गतीने व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायलर झाल्यानंतर 12 तासांहून अधिक काळ लोटला. या व्हिडीओबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाला विचारलं असता, त्यांनी व्हिडीओतील नेमके रेल्वे स्थानक आणि एक्स्प्रेस ओळखणे शक्य नसल्याचे सांगितले.
मंगळवारी (19 सप्टेंबर) झालेल्या पावसाचा जोर बुधवारी (20 सप्टेंबर) देखील कायम होता. यामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकात पावसाचं पाणी साचलं होते. यावेळी फलाट क्रमांक 4 वर जलदगतीने एक्स्प्रेस आली व रेल्वे रुळावर साचलेले पाणी फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडाले. स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाइल कॅमे-यामध्ये कैद केला. मुळात रुळावर पाणी असतानादेखील जलदगतीने एक्स्प्रेस घेऊन जाणे, हे धोकादायक आहे. हा व्हिडीओ पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
रेल्वेतील सूत्रांच्या माहितीनुसार, 'ती' एक्स्प्रेस अहमदाबाद-मुंबई लोकशक्ती एक्स्प्रेस किंवा जयपूर-पुणे एक्स्प्रेस यांपैकी असण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासन कोणतीही माहिती देऊ इच्छित नाही. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही असतानादेखील रेल्वे प्रशासनाला 12 तासांहून अधिक वेळ केवळ एक्स्प्रेस ओळखायला लागत आहे. यामुळे पूर्ण स्थानकाच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
'स्थानक/एक्स्प्रेसची ओळख पटलेली नाही'
जलद गतीनं जाणा-या एक्स्प्रेसची ही घटना बुधवारी सकाळी पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर घडलेली आहे. मात्र नेमके रेल्वे स्थानक आणि एक्स्प्रेसची ओळख अद्याप पटलेली नाही. - रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी ,पश्चिम रेल्वे
'स्थानकाची ओळख पटली नाही म्हणणं चुकीच'मुळात मुंबईमधील रेल्वे स्थानकामधील अनेक प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमाने उघडकीस येतात. वृत्तवाहिन्यामध्ये दिसत असताना देखील रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही नाही, स्थानकाची ओळख पटलेली नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. - समीर झवेरी , रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता