Join us

नालासोपाऱ्यातील कुटुंब नऊ महिने बेपत्ता

By admin | Published: December 18, 2015 1:12 AM

ज्योतिष पाहण्याचा व्यवसाय करणारे नालासोपारा येथील अख्खे एक कुटुंबच नऊ महिन्यांपासून बेपत्ता आहे. या इगवे कुटुंबातील एका सुनेच्या आईने तब्बल नऊ महिन्यांनी तक्रार

वसई : ज्योतिष पाहण्याचा व्यवसाय करणारे नालासोपारा येथील अख्खे एक कुटुंबच नऊ महिन्यांपासून बेपत्ता आहे. या इगवे कुटुंबातील एका सुनेच्या आईने तब्बल नऊ महिन्यांनी तक्रार दाखल केल्याने पोलीसही चक्रावले आहेत. पूर्वेकडील नालेश्वर नगरातील वैष्णवी सदनच्या तिसऱ्या मजल्यावरील ३०३ क्रमांकाच्या घरात ते राहतात. रामदास इगवे (५५), त्यांची पत्नी मंगलबाई (४२), मुलगा भाविन(२५), सून आशा (२०), त्यांची दहा महिन्यांची मुलगी, दुसरा मुलगा सचिन (२४), सून उज्ज्वला(१९) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. १० महिन्यांपूर्वी आशाचे माहेरी बाळंतपण झाले. सासरची मंडळी अवघ्या एका महिन्यातच आशा आणि तिच्या मुलीला घेऊन गेली. आशा सासरी गेल्यानंतर आठ दिवसांनी तिची आई राजश्री घरावत नालासोपारा येथे आली असता घराला कुलूप दिसले. त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, कुणीच काही माहिती देऊ शकले नाहीत. त्यानंतर आशाच्या माहेरच्या लोकांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सगळ्यांचे मोबाइल बंद होते. नातेवाईकांकडे चौकशी केली असता, कुठेच थांगपत्ता लागला नाही. तब्बल नऊ महिने सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर काहीच ठावठिकाणा न लागल्याने, राजश्री घरावत यांनी तुळींज पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन दिवसांपासून मोबाइलच्या लोकेशनवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात काहीही हाती लागत नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. घातपात झाल्याच्या शंकेने नातेवाईक चिंताक्रांत झाले आहेत.