लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळापूर्व कामांची मुदत संपण्यास काही दिवसच उरले असल्याने पालिकेची धावपळ सुरू आहे. रस्ते आणि नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे कामे दिलेल्या मुदतीतच पूर्ण होतील, असा विश्वास आयुक्त अजय मेहता यांना वाटत आहे. मात्र या कामांवर नगरसेवक नाराज आहेत. ही डेडलाइन पाळण्यात रस्ते विभाग अपयशी ठरला आहे. मुंबईतील रस्त्यांची कामे रखडल्याने रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्यांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे.मुंबईमध्ये ४२५ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ववत करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र रस्त्यांची कामे फक्त ५० टक्केच झाली आहेत. त्यामुळे या शेवटच्या आठवड्यात रस्त्यांची कामे पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याची नाराजी विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. परंतु प्रशासन मात्र सारेकाही आलबेल असल्याचे चित्र निर्माण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या महिन्यात दगडखाणींवर हरित लवादाने बंदी घातल्यामुळे खडीचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे मुंबईतील रस्त्यांची कामे ठप्प पडली होती. खडी मिळवणे हे काम ठेकेदारांचे असताना खडी मिळावी म्हणून सत्ताधारी आणि रस्ते विभागातील अधिकारी धावत होते. सत्ताधारी आणि रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी पळापळ करूनही रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्यांची चौकशी करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.
नालेसफाई, रस्त्यांच्या कामावर विरोधक नाराज
By admin | Published: May 25, 2017 12:48 AM