Join us

नालेसफाई ९५ टक्केच

By admin | Published: June 15, 2014 11:43 PM

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत ९५ टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत ९५ टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. शहरात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र, अद्याप काही ठिकाणी नालेसफाईची कामे शिल्लक आहेत. विशेष म्हणजे या नालेसफाईकरिता ५ जूनही ही अंतिम तारीख होती. त्यानंतरही हे काम पूर्ण न झाल्याने काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची शक्यता पालिकेने वर्तवली आहे.नऊ प्रभाग समित्यांमध्ये ३९८ नाले आहेत. या नाल्यांच्या सफाईसाठी सुमारे दोन कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ५२ ठेकेदारांना पालिकेने काम दिले आहे. वागळे इस्टेट, ज्ञानेश्वरनगर आणि रायलादेवी, उथळसर आदी परिसरांत पाहिजे त्या पद्धतीने नालेसफाई झालेली नाही. कळवा-मुंब्रा हे दोन्ही प्रभाग खाडीच्या जवळ असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नाले फुल्ल होऊन नागरी परिसरात पाणी घुसण्याच्या घटना या प्रभागामध्ये घडतात. मागील पावसाळ्यात या ठिकाणी जीवितहानीच्या घटना घडल्या होत्या. सध्या अनेक नाल्यांमधील कचरा आणि गाळ जैसे थे आहे. वरवरचा कचरा ठेकेदारांनी काढला आहे. उरलेला कचरा पावसाळ्यात वाढलेल्या पाण्यामुळे वाहून जाईल, अशी आशा बाळगली जात आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त प्रकाश बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अद्यापही दोन ते तीन टक्के नालेसफाईचे काम बाकी आहे, ते लवकरच होईल़ शिवाय, जिथे वेळेत कामे झाली नाहीत, त्या ठेकेदारांना बिलाचे पैसे देताना कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)