नालेसफाई जानेवारीपासूनच
By admin | Published: January 6, 2016 01:47 AM2016-01-06T01:47:21+5:302016-01-06T01:47:21+5:30
नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर, शहाणपण सुचलेल्या महापालिका प्रशासनाने ठेकेदारांना चाप लावण्यासाठी नवीन धोरण तयार केले
मुंबई : नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर, शहाणपण सुचलेल्या महापालिका प्रशासनाने ठेकेदारांना चाप लावण्यासाठी नवीन धोरण तयार केले आहे़ त्यानुसार, जानेवारीपासून नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात होणार आहे़ ही सफाई वर्षभर सुरू राहणार
असून, ठेकेदारांवर वॉच ठेवण्यासाठी कडक बंदोबस्तच ठेवण्यात आला आहे़
२०१५ ते २०१७ असे दोन वर्षांसाठी नालेसफाईचे कंत्राट पालिकेने दिले होते़, परंतु बनावट डंपिंग ग्राउंडचे ना हरकत प्रमाणपत्र, काढलेल्या गाळाचा नसलेला हिशोब, अशा अनेक अनियमितता आढळून आल्यानंतर, पालिकेने कंत्राट रद्द केले़ पारदर्शक कार्यप्रणाली आणल्याचा दावा पालिका एकीकडे करीत असताना, ठेकेदारांनी पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून दाखविला़
यामुळे आयुक्त अजय मेहता यांनी नवीन धोरण सर्वपक्षीय गटनेत्यांपुढे ठेवले आहे़ त्यानुसार, यापुढे नालेसफाई चार टप्प्यांमध्ये होणार आहे़ जानेवारी ते मार्च २० टक्के, एप्रिल ते ३१ मे ६० टक्के, जून ते सप्टेंबर २० टक्के आणि आॅक्टोबर ते मार्चपर्यंत पुन्हा २० टक्के गाळ काढणे ठेकेदारांना बंधनकारक असणार आहे़ पावसाळ्यात प्रत्येक नाल्यामधील गाळ दररोज साफ करणे बंधनकारक असणार आहे़
(प्रतिनिधी)