नालेसफाईसाठी ठेकेदार नाहीत

By admin | Published: March 23, 2017 01:59 AM2017-03-23T01:59:24+5:302017-03-23T01:59:24+5:30

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामात पुन्हा एकदा ठेकेदारांनी खो घातला आहे. छोटे नाले साफ करण्यासाठी

Nalesfai has no contractor | नालेसफाईसाठी ठेकेदार नाहीत

नालेसफाईसाठी ठेकेदार नाहीत

Next

मुंबई : पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामात पुन्हा एकदा ठेकेदारांनी खो घातला आहे. छोटे नाले साफ करण्यासाठी ठेकेदार नेमण्याचे पालिकेचे प्रयत्न चारवेळा निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच हे काम विभाग स्तरावर व स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत घेतला आहे. तसेच ठरलेल्या वेळापत्रकानुसार नालासफाईचे काम पूर्ण करून घेण्याची ताकीदच सर्व विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
पावसाळ्यापूर्व कामांचा आढावा घेण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. यासाठी विशेष बैठक पालिका मुख्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त (शहर) पल्लवी दराडे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यामध्ये मोठ्या नाल्यांची सफाई ठरलेल्या वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मात्र छोट्या नाल्यांच्या निविदा प्रक्रियेस कंत्राटदारांकडून
प्रतिसाद न मिळाल्याने ही कामे गेल्या वर्षीप्रमाणेच विभाग स्तरावर व स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने ७ एप्रिलपासून सुरू करावीत, असा निर्णयही घेण्यात आला.
छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी चारवेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या.
मात्र, या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला असणारी जाळीची झाकणे, पर्जन्यजल वाहिन्यांपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी असणाऱ्या छोट्या वाहिन्या तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पर्जन्यजल वाहिन्या आदींची सफाई १ एप्रिलपासून सुरू करावी. छोट्या व मोठ्या नाल्यांची सफाई ठरलेल्या वेळेत पूर्ण व दर्जेदार होईल, याची खबरदारी घेण्याची ताकीद सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nalesfai has no contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.