१५२.२५ कोटींचा खर्च अपेक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी नियमित नालेसफाई होऊनही पावसाळ्यात नाले तुंबतात. परिणामी, पावसाच्या पाण्याचा निचरा जलद होत नसल्याने अनेक भागांमध्ये पाणी तुंबते. त्यामुळे यावर्षी एप्रिलऐवजी फेब्रुवारीच्या अखेरीस नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली जाईल. यासाठी १५२.२५ कोटी खर्च अपेक्षित आहे.
मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यादरम्यान १५ टक्के व पावसाळ्यानंतर १० टक्के याप्रमाणे केली जाते. शहरी भागात अंदाजे ३२ कि. मी. लांबीचे मोठे नाले आहेत. त्यांच्या सफाईसाठी १२.१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर पूर्व उपनगरातील मोठ्या नाल्यांची लांबी सुमारे १०० कि. मी. असून त्यातील गाळ काढण्यासाठी २१.०३ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम उपनगरांमध्ये असणाऱ्या १४० कि. मी. लांबीच्या मोठ्या नाल्यांच्या साफसफाईकरिता २९.३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या तिन्ही भागातून वाहणाऱ्या सुमारे २० कि. मी. लांबीच्या मिठी नदीच्या सफाई कामाचा कार्यादेश देण्यास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली. यासाठी ८९.६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मिठी नदीची साफसफाई करताना गाळाच्या एकूण परिमाणाच्या ८० टक्के साफसफाई ही पावसाळ्यापूर्वी व उर्वरित २० टक्के साफसफाई ही पावसाळ्यानंतर करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.