नालेसफाईच्या कामावरुन चौकीदाराकडून झाडाझडती, शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:04 AM2019-05-03T02:04:15+5:302019-05-03T06:24:35+5:30
निवडणुकीनंतरचे युतीचे रंग : सत्ताधाऱ्यांवर भाजपचा अविश्वास
मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजयासाठी युती करणारे पक्ष नालेसफाईच्या मुद्द्यावर आमनेसामने आले आहेत. मतदान आटोपताच पहारेकऱ्यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या काळात महापालिकेने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे या कामाची भाजप झाडाझडती घेणार आहे. शिवसेनेवर कुरघोडी करणाऱ्या या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
लोकसभेची रणधुमाळी संपताच मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. निवडणुकीच्या कामाचे कारण सांगून पालिका अधिकाऱ्यांनी नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते आहे. त्याचा फायदा ठेकेदारांनी घेत अद्याप कामाला वेग दिलेला नाही, या झालेल्या विलंबाचा आयुक्तांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. मुंबईभर नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी सर्व भाजप नगरसेवकांना देत शिवसेनेला अडचणीत आणले आहे.
वांद्रे, खार, सांताक्रुझ, अंधेरी, जुहू या उपनगराच्या पश्चिमेकडील भागात पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी गझदरबांध येथील नालेसफाईची कामे वेळीच पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याचबरोबर गझदरबांध येथे बांधण्यात येणाºया पंपिंग स्टेशनचे कामही अपूर्ण आहे. या कामांमध्ये दिरंगाई झाल्यास वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या नागरी भागासह पश्चिम रेल्वेला पुराचा फटका बसतो. येथील चार प्रमुख
नाल्यांच्या सफाईच्या कामाची व पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी भाजपने आज केली. ही मोहीम सुरूच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Santacruz Gazdharbandh pumping stn is need for all bandra/khar/santacruz/Juhu Residents ! Personally seen trial run of Screening machine,pumping machine,conveyor belt& floodgates ! Will follow it up till fully operational ! @alkaskerkar@MhatreViru@Hetalgalabjp@poonam_mahajanpic.twitter.com/O6uLzxtPyJ
— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) May 2, 2019
हे नाले गाळातच...
पीएनटी नाला बॉक्स, खार पहिला रस्ता नाला, शास्त्रीनगर नाला, कडेश्वरी नाला, रिलिफ रोड नाला आणि छोटी गटारे यांच्यातील गाळ काढण्यास अद्याप सुरुवातच झालेली नाही.
मेन एव्हेन्यू नाला बॉक्स याचे काम केवळ सहा टक्के, नॉर्थ एव्हेन्यू नाला बॉक्सचे काम पाच टक्के, हरिजन कॉलनी नाल्याचे काम केवळ १४ टक्के झाले आहे. बोरण नाला बॉक्सचे काम चार टक्के झाले आहे.
मोठ्या नाल्यांमध्ये एसएनडीटी नाल्यातून २३ टक्के, साऊथ एव्हेन्यू नाला ४५ टक्के, मेन एव्हेन्यू नाला ३७ टक्के, नॉर्थ एव्हेन्यू नाला ८३ टक्के, पीएनटी नाला २३ टक्के गाळ काढून वाहून नेल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
राहुलनगरमध्ये ४१ टक्के एवढीच कामे पूर्ण झाली आहेत. दरवर्षी एच पश्चिम विभागातून ७०० हून अधिक गाड्या गाळ निघतो. या वर्षी आजपर्यंत केवळ २४५ गाड्या गाळ काढण्यात आल्या आहेत.