नाल्यांतील पाणी रस्त्यावर
By admin | Published: August 2, 2014 01:39 AM2014-08-02T01:39:03+5:302014-08-02T01:39:03+5:30
औद्योगिक वसाहतीमधील नाल्यांची दुरवस्था झाली आहे. गाळामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहतुकीवरही परिणाम होऊ लागला आहे
नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील नाल्यांची दुरवस्था झाली आहे. गाळामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहतुकीवरही परिणाम होऊ लागला आहे.
ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीला समस्यांनी ग्रासले आहे. पालिकेने पावसाळापूर्व नालेसफाई केल्याचा दावा केला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी नालेच अस्तित्वात नाहीत. काही ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. नेरूळ उड्डाणपुलाकडून उरण फाट्याकडील सर्व्हिस रोडवर मोठ्याप्रमाणात पाणी रस्त्यावर आले आहे. या ठिकाणी खड्डेही आहेत. खड्डे दिसत नसल्यामुळे अपघात होऊ लागले आहेत.
नेरूळमधील इंडियन आॅईल कंपनीजवळ डोंगरातून येणारे पाणी थेट रस्त्यावर आले आहे. बोनसरी गावाच्या जवळही अशीच स्थिती झाली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे काही ठिकाणी जवळपास एक फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. रिक्षा, छोटी कार, मोटारसायकल चालविणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या परिसरात वारंवार अपघातही होऊ लागले आहेत. महापालिकेने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेसे नाले बांधले नाहीत. उपलब्ध नाल्यांची साफसफाई केली जात नाही. (प्रतिनिधी)