Join us

नामफलकाच्या श्रेयवादाचा राष्ट्रवादीला फटका

By admin | Updated: October 22, 2014 01:18 IST

दिवाळे गावातील जेट्टीच्या नामफलकावरून मेअखेरीस राष्ट्रवादीमधील वाद उफाळून आला.

नामदेव मोरे, नवी मुंबईदिवाळे गावातील जेट्टीच्या नामफलकावरून मेअखेरीस राष्ट्रवादीमधील वाद उफाळून आला. मंदाताई म्हात्रे यांनी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात बंड पुकारून थेट भाजपात प्रवेश केला व निवडणुकीत यश मिळविले. नामफलकाचा वादच त्यांच्यासाठी टर्निंग पॉर्इंट ठरला आहे. बेलापूर मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी हरविले आहे. यामुळे शहरातील नामफलकाच्या वादाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवाळे गावातील जेट्टीचे उद्घाटन मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु मेअखेरीस हा नामफलक मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी काढून टाकला. तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनीच हा फलक तोडण्यास सांगितल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला व त्यांनी नाईक यांना जाब विचारला. यानंतर पक्षश्रेष्ठींकडेही तक्रार केली होती. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे नेते अन्याय करत आहेत. सातत्याने डावलत असल्याचा आरोप करण्यात आला. पक्षाने दखल न घेतल्याने त्यांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला. हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला असून निवडणुकीमध्ये थेट नाईक यांना हरवून त्या जायंट किलर ठरल्या आहेत. या यशामध्ये दिवाळेसह येथील प्रकल्पग्रस्तांची मते निर्णायक ठरली आहेत. नामफलकाचा वाद हा टर्निंग पॉर्इंट ठरल्याचे आता सर्वजण मान्य करू लागले आहेत. नवी मुंबईमध्ये नामफलकावरून राष्ट्रवादीमधील भांडणाला ९ वर्षांची पार्श्वभूमी आहे. ३० एप्रिल २००६ मध्ये सीबीडीमधील राजीव गांधी मैदानाच्या बाजूच्या सभामंडपाच्या उद्घाटनास मंदा म्हात्रे यांना आमंत्रण दिले नाही व त्यांचे नावही टाकले नव्हते. तेव्हाही म्हात्रे व नाईक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. एकाच पक्षामध्ये असूनही महापालिकेच्या कार्यक्रमांना बोलावले जात नाही याचे शल्य मंदा म्हात्रे यांना नेहमीच होते. परंतु विधानसभा निवडणुकीतील यशामुळे यापुढे मतदार संघामधील महत्त्वाच्या वास्तूंच्या उद्घाटनास आमदार म्हणून मंदा म्हात्रे यांना हक्काने बोलवावे लागणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.