मुंबई : ‘शब्द द बुक गॅलरी’ २०१५ चे पुरस्कार गुरुवारी जाहीर झाले. यात वसंत पळशीकर यांना ‘दुर्गा भागवत शब्द पुरस्कार’, कवी सिद्धलिंगय्या यांना ‘नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार’, कृष्णात खोत यांना ‘बाबूराव बागूल शब्द पुरस्कार’ आणि महादेव मोरे यांना भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार जाहीर झाला आहे. दुर्गा भागवत पुरस्काराचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे प्रकाशकालाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते. कथानात्म साहित्यासाठी देण्यात येणाऱ्या बाबूराव बागूल शब्द पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. यंदा महादेव मोरे यांना या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. भारतीय भाषांतील कवितेत विशेष योगदान देणाऱ्या कवीस नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार देण्यात येतो. एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. या वर्षी कन्नड भाषेतील कवी सिद्धलिंगय्या यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिंदीतील ज्येष्ठ कवी असद जैदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे शनिवार ९ मे २०१५ रोजी वितरण होणार आहे. या पुरस्कार समारंभाचे अध्यक्षपद ज्येष्ठ समीक्षक म.सु. पाटील भूषवणार आहेत. हा कार्यक्रम विलेपार्ले येथील घैसास सभागृह, डहाणूकर कॉलेज येथे सांयकाळी ५.३० वाजता होणार आहे. (प्रतिनिधी)
कवी सिद्धलिंगय्या यांना नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार
By admin | Published: May 01, 2015 1:22 AM