Join us

हवाई सुंदरी अभ्यासक्रमाच्या नावाखाली विद्यार्थिनीची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 1:53 AM

अंधेरीतील घटना : एमफील इंटरनॅशनल शिक्षण संस्थेविरोधात गुन्हा

मुंबई : हवाई सुंदरी होण्यासाठीच्या अभ्यासक्रमाच्या नावाखाली विद्यार्थिनीची फसवणूक केल्याच्या आरोपावरून, अंधेरीतील एमफील इंटरनॅशनल शिक्षण संस्थेविरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार विद्यार्थिनी अलीना मार्टीन्स (१९) ही गोराई परिसरात कुटुंबीयांसोबत राहते. तिला हवाई सुंदरी होण्यासाठी शिक्षण घ्यायचे असल्याने, तिचे पालक विविध शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाची माहिती घेत होते. त्याच दरम्यान, एमफील इंटरनॅशनल संस्थेबाबत माहिती मिळाली. त्यांनी तेथे चौकशी केली असता, अभ्यासक्रम कोइम्बतूर येथील भारतीय महाविद्यालयाचा असून, तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ४ लाख २ हजार रुपये फी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यात अभ्यासक्रमादरम्यान युनिफॉर्म, लॅपटॉप, स्टडी टूर मोफत देणार असल्याचेही सांगितले. अभ्यासक्रम आवडल्याने त्यांनी होकार दिला.

अडीच हजार रुपये भरून नोंदणी केली. त्यानंतर, प्रवेश घेण्यासाठी ४२ हजार रुपयांचा चेक दिला. ठरल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे त्यांना देण्यात आली. जुलै, २०१८ संपण्यापूर्वी हा कोर्स सुरू होईल. त्याबाबत संपर्क करून कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले.मात्र, सदरचा कोर्स सुरू झाला नाही. त्यामुळे मार्टीन कुटुंबीयांनी त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना संस्थेच्या दिल्ली येथील कार्यालयातून संपर्क साधण्यात आला. आधी अभ्यासक्रम दोन महिन्यांनंतर सुरू होणार, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर, ८० हजार रुपयांनी फीवाढ झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांना सुरुवातीला अर्धी रक्कम भरण्यास सांगितले. मात्र, कोर्स सुरू न करता ही मंडळी पैसे उकळत असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत करण्याबाबत तगादा लावला. मात्र, त्यांनी रक्कम ‘नॉटरिफंडेबल’ असल्याचे सांगताच, त्यांना धक्का बसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ते अधिक तपास करीत आहेत. त्यात, अशा प्रकारे अन्य कोणाची फसवणूक झाली आहे का? या दिशेनेही पोलीस अधिक शहानिशा करीत आहेत.

अन्य कोणाच्या फसवणुकीचाही होणार तपासकोर्स सुरू न करता ही मंडळी पैसे उकळत असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत करण्याबाबत तगादा लावला. मात्र, त्यांनी रक्कम ‘नॉटरिफंडेबल’ असल्याचे सांगताच, त्यांना धक्का बसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ते अधिक तपास करीत आहेत. त्यात, अशा प्रकारे अन्य कोणाची फसवणूक झाली आहे का? या दिशेनेही पोलीस अधिक शहानिशा करीत आहेत.

टॅग्स :धोकेबाजी