सर्व प्रकारच्या गुन्ह्याशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचं नाव जोडलं आहे; भाजपाचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 03:57 PM2021-11-16T15:57:21+5:302021-11-16T15:58:00+5:30
राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झालं आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा असा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणे ही आपली भूमिका आहे. पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची आंदोलने झाली. एसटी कामगारांच्या संपात भाजपाचा सक्रीय सहभाग आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सत्ताधारी महाविकास आघाडीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. जवळ जवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही. त्रिपुरात जी घटना घडली नाही तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात, त्यासाठी पंधरा – वीस हजार लोक रस्त्यावर येतात व पोलिसांवर हल्ला करतात याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तरीही भाजपावर आरोप करतात. अंमलीपदार्थांचे समर्थन केले जाते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्या
राज्यातील जनतेने २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मते दिली. पण शिवसेनेने विश्वासघात केला. आता राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. आपले त्यांना आव्हान आहे की, हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्या, भाजपा निवडणूक जिंकेल असं आवाहन भाजपा राष्ट्रीय प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमीवर हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदू समाजाचा अपमान केला जातो. सत्ताधारी पक्ष हिंदुत्व सोडून परिवार पार्टी झाला आहे. परिवाराचा विकास आणि महाराष्ट्राचा विनाश चालू आहे, हे दुर्दैव आहे. राज्यातील जनता दुःखी आहे आणि जनविरोधी सरकारला हटवायला उत्सूक आहे. हे नागरिकविरोधी सरकार लवकरच हटेल असा आपल्याला विश्वास आहे असंही सी.टी राव यांनी सांगितले.