Join us

मुंबई बंदराला सावरकरांचे नाव द्या

By admin | Published: August 14, 2015 2:03 AM

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाला येत्या २६ फेब्रुवारी रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून मुंबई बंदराला स्वा. सावरकरांचे नाव

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाला येत्या २६ फेब्रुवारी रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून मुंबई बंदराला स्वा. सावरकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केंद्रीय सागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी नुकतीच दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन ही मागणी केली. ‘बंदराच्या नामांतरासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,’ असे आश्वासन गडकरी यांनी दिल्याचे स्मारकाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई बंदराशी स्वा. सावरकरांच्या विशेष स्मृती निगडित आहेत. भारतात परतण्याची कोणतीही शाश्वती नसताना ९ जून १९०६ रोजी सावरकर मुंबई बंदरातूनच क्रांतीकार्यासाठी ‘पर्शिया’ या नौकेने लंडनला रवाना झाले होते. तर, २९ जून १९१०ला ‘मोरया’ या बोटीतून ब्रिटिशांनी त्यांना कैदी म्हणून भारतात आणले. मोरिया बोटही मुंबई बंदरातच आली. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशा आर्त शब्दांत सागराला आळवणाऱ्या सावरकरांचे समुद्राशी अतूट नाते होते. मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराला जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले आहे. त्याच धर्तीवर मुंबई बंदराला सावरकरांचे नाव देण्यात यावे. त्यामुळेच सावरकरांच्या सुवर्ण स्मृती वर्षात मुंबई पोर्ट ट्रस्टला त्यांचे नाव देणे उचित आदरांजली ठरेल, असे स्मारकाचे म्हणणे आहे.