'कोटीयन' नाव धारण करून राहत होता फरेरा, वाचा फरेराची कहाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:26 AM2018-08-31T06:26:51+5:302018-08-31T06:27:43+5:30
कुटुंबावर कारवाईचा परिणाम नाही : नाव बदलल्याने ठाणे पोलिसांना दिला गुंगारा
राजू ओढे
ठाणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आणि सध्या नजरकैदेत असलेल्या अरुण थॉमस फरेरा याच्या मागावर ठाणे पोलीसही होते. मात्र, जवळपास वर्षभरापासून तो ‘अरुण कोटीयन’ असे नाव बदलून राहत असल्याने त्याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळू शकला नाही.
शहरी भागातील तरुणांमध्ये माओवाद रुजवण्यासाठी कट आखल्याच्या आरोपाखाली २८ आॅगस्ट रोजी पुणे पोलिसांनी छापे मारून पाच आरोपींना अटक केली. यात ठाण्याच्या अरुण फरेराचाही समावेश होता. (काही ठिकाणी उल्लेख परेरा असाही आहे.) बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे पोलिसांचे पथक गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अरुण फरेराला घेऊन ठाण्यात दाखल झाले. फरेराला त्याच्या निवासस्थानी सोडण्यात येत असल्याची नोंद या पथकाने नौपाडा पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर ६च्या सुमारास पोलिसांनी फरेराला चरई येथील धोबीआळीतील शेरॉन हाउसिंग सोसायटीतील निवासस्थानी सोडले. या सोसायटीतील ४०१ क्रमांकाच्या सदनिकेत फरेराच्यासासू जेनिफर कुटिनो राहतात.
ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून आपला शोध सुरू असल्याची जाणीव फरेरालाही होती. त्यामुळे तो लोकांना आडनाव कोटीयन असल्याचे सांगायचा. पोलिसांनी या भागात बऱ्याचदा चौकशी केली. मात्र, त्याने नावच बदलले असल्याने पोलिसांना थांगपत्ता लागू शकला नाही. सध्या त्याच्या सदनिकेच्या प्रवेशद्वारावरच पुणे पोलिसांचे तीन कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय ठाणे पोलीस, विशेष शाखा, दहशतवादविरोधी पथकाचे आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे कर्मचारीही साध्या वेशात पाळत ठेवून आहेत.
पोलीस बंदोबस्ताला पत्नी वैतागली
अरुण फरेराला १७ वर्षांचा एक मुलगा असून त्याचे शिक्षण ठाण्यातच सुरू आहे. त्याची पत्नी मूळची ठाण्याचीच असून ती कांदिवली येथे खासगी कंपनीत नोकरी करते. तो मूळचा मुंबईचा असून त्याचे शिक्षणही तेथेच झाले. तो आधी वांद्रे येथे वास्तव्यास होता. तेथे त्याचा भाऊ राहतो. २०१४-१५ अशी दोन वर्षे तो चरई येथील मार्कस सोसायटीत भाड्याने राहत होता. त्या वेळीही पोलिसांना फरेराची माहिती मिळाली होती. मात्र, एकाच नावाच्या तीन सोसायट्या चरईत असल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळू शकला नव्हता. फरेराचे एका ठिकाणी वास्तव्य नसायचे. तो कधी वांद्र्याला तर कधी ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहायचा.
फरेराचे वास्तव्य असलेल्या सोसायटीत चौकशी केली असता या कारवाईचा त्याच्या कुटुंबावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती त्यांनी खासगीत दिली. फरेराचे संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. त्यांची दिनचर्या सामान्य आहे. चहा, नाश्ता करताना त्यांच्या सदनिकेतून हसण्याचे आवाज येतात, असेही शेजाºयांनी सांगितले. त्याची पत्नी मात्र पोलीस बंदोबस्ताला आणि परिसरातील रहिवाशांना वैतागली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोणत्याही कामासाठी बाहेर पडली की, परिचयाचे लोक तिला याविषयी नानाविध प्रश्न विचारतात. त्यामुळे ती घराबाहेर पडण्याचे टाळत आहे. भाजीपाला किंवा किरकोळ सामान विकत आणण्यासारखी घरातील किरकोळ कामे ती सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडून करून घेत आहे.
राजकीय षड्यंत्राचा भाग - आव्हाड
फरेराविरुद्ध पोलिसांनी केलेली कारवाई ही एका षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केला. आव्हाडांनी गुरुवारी सकाळी फरेराची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी सरकारवर तोंडसुख घेतले. देशात डाव्या विचारसरणीचे बरेच लोक आहेत. ते सर्व देशद्रोहीच आहेत का, असा आरोप आव्हाड यांनी केला. फरेरा कुटुंबाला ३० वर्षांपासून ओळखतो. ते कुटुंब सर्वसाधारण असल्याचे ते म्हणाले. फरेराचे काही संशयास्पद ई-मेल आढळले असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे, याकडे आव्हाड यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, एखाद्याचा ई-मेल हॅक करून त्याचा गैरवापर करणे फार कठीण नाही.