दादर स्टेशनच्या नामांतराला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:55 AM2018-12-07T05:55:36+5:302018-12-07T05:55:47+5:30
भीम आर्मीकडून दादर स्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे नामांतर करण्यात यावे यासाठी गुरुवारी महापरिनिर्वाण दिनी आंदोलन करण्यात आले.
मुंबई : भीम आर्मीकडून दादर स्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे नामांतर करण्यात यावे यासाठी गुरुवारी महापरिनिर्वाण दिनी आंदोलन करण्यात आले. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीला विरोध केला आहे. दादर स्थानकाचे नाव दादरच राहू द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळपासूनच दादर स्टेशनमध्ये प्रवेश करत जागोजागी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ लिहिलेले स्टिकर्स चिकटवले. पश्चिम रेल्वेवरील स्थानकांना ‘राम मंदिर’, ‘प्रभादेवी’ अशी बदललली नावे देण्यात आली. मग दादर स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का दिले जात नाही, असा सवाल भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केला.
दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे करावे, अशी मागणी मागील २५ ते ३० वर्षांपासून होत आहे. मात्र, सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन केल्याचे भीम आर्मीचे अध्यक्ष अशोक कांबळे म्हणाले. आंदोलनादरम्यान, भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
>नामांतरावरून अनुयायांमध्येच दुमत
दादर स्थानकाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी भीम आर्मीने आंदोलनादरम्यान उचलून धरली असली तरी भारिपचे राष्टÑीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या मागणीला विरोध केला आहे. दादरचे नाव दादरच राहू द्यावे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. सॅण्डहर्स्ट रोड, कुलाबा, माहिम, दादर ही नावे तशीच राहिली पाहिजेत. या नावांमागे एक इतिहास आहे. सात बेटांची मुंबई अखंड करण्यात ज्यांचे योगदान होते, ज्या माणसांमुळे मुंबई झाली ती नावे कायम राहिली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, त्यांच्या या मतामुळे दादरच्या नामांतरावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींमध्येच दुमत असल्याचे समोर आले आहे.