Join us

हरविलेल्या आजोबांना शोधून देण्याच्या नावाखाली मैत्रिणीने गंडविले,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:06 AM

सव्वा दोन लाखांची फसवणूक, गुन्हा नोंदसव्वा दोन लाखांची फसवणूक, गुन्हा नोंदलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्षभरापासून बेपत्ता ...

सव्वा दोन लाखांची फसवणूक, गुन्हा नोंद

सव्वा दोन लाखांची फसवणूक, गुन्हा नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या वृद्ध

नवऱ्याला शोधून देण्याच्या नावाखाली मैत्रिणीनेच

७० वर्षीय आजींंना सव्वा दोन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार माहीम परिसरात घडला आहे. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहीम परिसरात ७० वर्षीय तक्रारदार आजी मुलीसोबत राहण्यास आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांचे पती बेपत्ता असून त्याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

यातच सहा महिन्यांपूर्वी त्यांची माहीम परिसरातील अर्चना हडकर नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली. घरातील सर्व गोष्टी तिच्यासोबत शेअर करू लागल्या. अर्चनानेही त्यांचा विश्वास संपादन केला. यातच त्यांच्या दादर येथील घराची ५० लाखांत विक्री झाली. याच्या व्यवहाराबाबतही त्यांनी संबंधित अर्चनाची मदत घेतली.

काही दिवसाने त्यांनी पतीबाबत अर्चनाला सांगितले. तिने तिचा दिनेश भाई नावाची व्यक्ती पतीला शोधून देऊ शकतो, फक्त त्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगितले आणि त्यांचा १ लाख ८० हजार रुपयांचा धनादेश स्वतःकड़े घेतला. पैसे मिळाल्यानंतर दिनेश भाई नावाच्या व्यक्तीने काळजी करू नका, लवकरच पतीला शोधून देतो असे सांगितले. पतीसोबत लवकरच भेट होणार या आशेने आजी आनंदात होत्या.

पुढे काही दिवसाने मुलीसोबत झालेल्या भांडणात त्यांचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र तुटले. त्यांनी ते बनवून घेण्यासाठी अर्चनाकडे दिले. अशात ३० मार्च रोजी त्यांनी बँकेत जाईन बँक स्टेटमेंट काढली. त्यात पैसे कमी असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत मुलाला सांगितले. त्यात १३ जानेवारी रोजी त्यांच्या खात्यातून १ लाख ८० हजार रुपये वजा झाल्याचे नमूद होते. मुलाने याबाबत विचारणा करताच त्यांनी संबंधित धनादेश माहीममधील तरुणीला दिल्याचे सांगितले. तरुणी फसवणूक करत असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी मंगळवारी दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

......

तरुणीला अटक

फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवत अर्चना हडकर या तरुणीला अटक करण्यात आली आहे. तरुणीच्या अटकेच्या वृत्ताला दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी दुजोरा दिला आहे.

....

माझे पैसे परत मिळावे...

पतीला शोधून देण्याच्या नावाखाली अर्चनाने माझी फसवणूक केली. यात तिला अटक झाली असून माझे पैसे परत मिळावे. या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.

- तक्रारदार आजी