मुंबई : घर देण्याच्या नावाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनपाल अरुण रसाळ याने लाखो रुपयांना फसवणूक केल्याची तक्रार कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र याबाबत आरोपीवर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निवेदन केतन जाधव यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना सादर केले आहे. या वनपालाने अन्य काही गरजूंचीही फसवणूक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फेब्रुवारी २०१२मध्ये राष्ट्रीय उद्यानातील सिंहविहारातील वनपाल रसाळ याने जोगेश्वरी येथील वांद्रेकरवाडीत राहाणाऱ्या दत्ताराम जाधव यांना वनखात्याच्या जागेत १४ लाख ३० हजार रुपयांना घर देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून ही रक्कम उकळली होती. त्याबदल्यात त्याने विक्री कराराची कागदपत्रेही दिली. मात्र अनेक वर्षे पाठपुरावा करूनही त्याने घराचा ताबा दिला नाही. त्याच्याकडे पाठपुरावा करणारे दत्ताराम जाधव यांचे २३ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले. त्यानंतर दत्ताराम जाधव यांचा मुलगा केतन यांनी वनपालाकडे पाठपुरावा केला असता १८ फेब्रुवारी २0१७ रोजी वनपालाने ३ लाख १० हजार रुपये परत केले आणि उर्वरित रक्कम देण्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. त्याचबरोबर किसन रसाळ याने महाराष्ट्र बँकेच्या बोरीवली (पूर्व) शाखेचे तीन धनादेशही दिले. मात्र अद्याप पैसे नसल्याने ते बँकेत भरू नका, असेही बजावले. या फसवणुकीबाबत केतन जाधव यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र कागदोपत्री पुरावे असतानाही पुढे कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी एप्रिल २०१८मध्ये माहिती अधिकाराअंतर्गत तपासाबाबतची माहिती पोलिसांकडून मागवली असता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र अद्याप अटकेची कारवाई केली नाही.प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी कराउद्यान कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारे आणखी काही गरजूंची फसवणूक झाल्याची शक्यता असल्याने याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मोहन कृष्णन यांनी केलीआहे.