मलबार हिलचे नामकरण सेनेला पडणार महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 01:07 AM2018-12-09T01:07:41+5:302018-12-09T01:08:00+5:30
आयाराममुळे अडचणीत : जागा दाखविण्याची स्वपक्षातून मागणी
मुंबई : कुर्ला येथील भूखंड संपादनाचा फेटाळलेला प्रस्ताव रिओपन करण्याची नामुश्की ओढावली असताना आता मलबार हिलच्या नामकरणाच्या मागणीने शिवसेनेला गोत्यात आणले आहे. आयारामाच्या मेहेरबानीचे हे फळ असल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे आयारामांना त्यांची जागा दाखविण्याची मागणी स्वपक्षातूनही होऊ लागली आहे.
कुर्ला येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड संपादन करून त्या ठिकाणी उद्यान उभारण्यात येणार होते. मात्र सुधार समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही पालिका महासभेत शिवसेनेने फेटाळला. यापूर्वी जोगेश्वरी, दिंडोशी आणि कांदिवली येथील जागा विकासकांच्या घशात गेल्यामुळे विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. आगामी निवडणुकांपूर्वी असे वाद शेकण्याची भीती असल्याने शिवसेनेने तत्काळ घूमजाव केला.
हा प्रस्ताव प्रशासनामार्फत रिओपन केल्यानंतर मंजूर करून मोकळा भूखंड गमविण्याच्या पापातून मुक्ती मिळविण्याच्या तयारीत शिवसेना असताना नवीन वाद उभा राहिला आहे. प्राचीन काळापासून प्रचलित असलेले मलबार हिल या परिसराचे बारसे करण्याचा घाट शिवसेना नगरसेवकाने घातला आहे. उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या या विभागाचे नामकरण ‘रामनगरी’ करण्याची ठरावाची सूचना पालिका महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
शिवसेनेच्या भूमिकेबाबत उत्सुकता
कुर्ला भूखंडाचा प्रस्ताव रिओपन करण्याची मागणी करताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि दिलीप लांडे यांनी कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव महासभेत आणून फेटाळला, असे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी होत असल्याने शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना कोंडीत : कोणत्या पक्षात रामाचे भक्त जास्त आहेत, यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये स्पर्धा सुरू आहे. गेल्या चार वर्षांच्या व पालिकेतील २१ वर्षांच्या कारभारात कोणताही ‘राम’ नसल्याने शिवसनेने आता रामनामाचा जप सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. कुर्ला भूखंड संपादनाचा प्रस्ताव १३ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा पालिका महासभेत रिओपन करून आणण्यात येणार आहे. तसेच मलबार हिलच्या नामकरणाचा प्रस्तावही चर्चेला येणार असल्याने विरोधकांनी शिवसेनेची कोंडी करण्याची जोरदार तयारी केली आहे.
चुकीला माफी नाही...
मनसेतून सहा नगरसेवक बरोबर घेऊन आल्याने दिलीप लांडे यांना शिवसेनेने थेट सुधार समितीचे अध्यक्षपद दिले. आयारामांना अशी सुर्वणीसंधी एका झटक्यात मिळत असल्याने निष्ठावंत मात्र नाराज आहेत. त्यामुळे कुर्ला भूखंड प्रकरण आणि आता मलबार हिलमुळे शिवसेना अडचणीत आल्याने नाराज निष्ठावंतही कुजबुज करू लागले आहेत. विरोधी पक्षांनी यापूर्वीच दिलीप लांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यात आता स्वपक्षीयही सूर मिसळण्याच्या तयारीत आहेत.