Join us

मुंबई सेंट्रलला नानांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 3:30 AM

‘बीते कल को सलाम’। नानांच्या आठवणींना उजाळा

मुंबई : नानांनी मुंबईसाठी दिलेले योगदान पाहता आताच्या पिढीला नानांचा विसर पडू लागला आहे, हे मुंबईकरांचे दुर्दैव आहे. नानांचे कार्य सदैव लक्षात राहावे, यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकाला ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे स्थानकाला नानांचे नाव देण्यात यावे, अशी नानाप्रेमींची इच्छा आहे.

डी अ‍ॅण्ड जे फोंडेशनतर्फे नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘बीते कल को सलाम’ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी परळ येथे करण्यात आले होते. रमेश जैन यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या कुटुंबातील सुरेंद्र शंकरशेठ, अतुल शंकरशेठ, अजित शंकरशेठ, उदय शंकरशेठ, विलास शंकरशेठ आणि अमर शंकरशेठ आदींची उपस्थिती होती.

बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एलफिन्स्टन कॉलेज, ग्रेट मेडिकल, स्टुडंट्स लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी या सामाजिक व शैक्षणिक संस्था उभारणीमध्ये नानांनी हातभार लावला आहे. नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने बालविवाह, सती या रूढी समाजाला किती घातक आहेत ते पटवून दिले. अशा तºहेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अरिष्ठ रूढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता. नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत अविरतपणे सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेची मुहूर्तमेढ नानांनी रोवली.

१६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. नाना शंकरशेठ यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळखले जाते. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसएमटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवर नाना शंकरशेठ यांचा पुतळा लावण्यात आला आहे. मुंबईच्या विकासाचा पाया, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना उतरवणाऱ्या नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना ‘आधुनिक मुंबईचा शिल्पकार’ म्हणून संबोधले जाते. कार्यक्रमादरम्यान, नानांच्या कामाच्या योगदानाबाबत मुंबईतील व्यापारी, शिक्षक, अभ्यासक आणि नगरसेविका यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला. 

टॅग्स :मुंबई