मानखुर्दच्या नव्या उड्डाणपुलाला ‘सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब’ नाव द्या; शिवसेनेची मागणी, भाजपाचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:26 PM2021-06-13T14:26:09+5:302021-06-13T14:27:36+5:30
मानखुर्द येथील उड्डाणपुलाच्या नावावरून शिवसेना-भाजपात वाद रंगला आहे.
मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना आता आणखी एका मुद्द्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगला आहे. मुंबईच्या घाटकोपर-मानखुर्द येथील लिंक रोडवरील नव्या उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद सुरू झाला आहे. मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब नाव द्यावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. तर शिवसेनेच्या मागणीला भाजपाने विरोध केला आहे.
राहुल शेवाळे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर छेडानगर ते मानखुर्दपर्यंत होत असलेल्या उड्डाणपुलास सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज(मोईन्नुदिन सुफी चिश्ती अजमेरी) यांचे नाव देण्यात यावे. छेडानगर ते मानखुर्द या परिसरात ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लीम धर्मियांची असल्याचं ऑल इंडिया उल्मा अँन्ड मशायक बोर्डाने आणि इतर संघटनांनी म्हटलं आहे. त्यामुळे या उड्डाणपुलास वरील नाव देऊन मुस्लीम भावनांचा सन्मान करावा ही मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
तर दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेने या उड्डाणपुलास लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाव देण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. यावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. उपाध्ये म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, मराठीबाणा सोडला, आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला. अण्णाभाऊ साठे म्हणजे सर्वसामान्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज. मानखुर्दच्या उड्डाणपुलास त्यांचे नाव देणं योग्य असताना ख्वाजा गरीब नवाज नाव देण्याची मागणी शिवसेना खासदार करतायेत असं त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले,मराठीबाणा सोडला, आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाज ही सोडला. #अण्णाभाऊ_साठे म्हणजे सर्वसामान्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज. मानखुर्दच्या उड्डाण पूलास त्यांच नाव देण योग्य असताना #ख्वाजा_गरीब_नवाज चे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना. pic.twitter.com/z4EDtWCIOP
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 13, 2021
त्याचसोबत घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरु होणाऱ्या मोठ्या उड्डाणपूलाचे नामकरण "छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल" असे करण्याची खासदार मनोज कोटक यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यांनी म्हटलंय की, घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड जोड मार्गावरील शिवाजीनगर आंतरछेदावरील उड्डाणपुलाचे काम आता अखेरच्या टप्प्यात आहे. हा उड्डाणपूल शिवाजीनगर भागावरून जातो. या उड्डाणपुलामुळे शिवाजीनगर परिसरातील व चौकातील रहदारी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. ही बाब लक्षात घेता शिवाजीनगर आंतरछेदावरील उड्डाणपुलास म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरु होऊन शिवाजीनगर आंतरछेदावरून पुढे जाणाऱ्या घाटकोपर - मानखुर्द जोडमार्गावरील पुलाचे 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर सदर उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी अध्यक्ष, स्थापत्य समिती उपनगरे यांच्याकडेही लेखी पत्राद्वारे गतवर्षीच केली आहे.