शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांची लूट, पुस्तके दुप्पट किमतीत विकत घेण्याची केली जातेय सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:17 AM2018-07-03T04:17:40+5:302018-07-03T04:17:49+5:30
उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुटीनंतर शहरातील काही शाळा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळा येत्या आठवड्यात सुरू होणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पालकांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांनी या नव्या शैक्षणिक वर्षातही डोके वर काढले आहे.
- सीमा महांगडे
मुंबई : उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुटीनंतर शहरातील काही शाळा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळा येत्या आठवड्यात सुरू होणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पालकांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांनी या नव्या शैक्षणिक वर्षातही डोके वर काढले आहे. शालेय साहित्य/ पुस्तके शाळेकडूनच विकत घेण्याची सक्ती पुन्हा काही शाळा पालकांवर करीत आहेत. अशा स्वरूपाची विक्री केली जाऊ नये, अशा सूचना असतानाही शहरातील शाळांनी आपली दुकानदारी सुरूच ठेवली असल्याचे पुन्हा समोर येत आहेत. शालेय साहित्याच्या नावाखाली शाळा पालकांची लूट करीत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून पालक शाळांची मनमानी सहन करीत आहेत.
धारावीच्या रॉयल सिटी इंग्लिश स्कूलने याच स्वरूपाच्या शालेय पुस्तकांची विक्री शाळेतून जबरदस्ती केल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. इंग्रजी शाळांची नियमबाह्य फीवाढ, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारणांनी वेठीस धरण्याचे प्रकार शहरात घडत असतानाच शालेय पुस्तके शाळेतूनच खरेदीची सक्ती करीत असल्याच्या तक्रारी पालक पुढे आणत आहेत. रॉयल सिटी इंग्रजी शाळेचे प्रशासन १ हजार २०० रुपयांची पुस्तके ४ हजार १०० रुपयांमध्ये पालकांना खरेदी करण्याची जबरदस्ती करत असल्याची तक्रार एका पालकाने केली आहे. ही पुस्तके विकत असताना त्याची कोणतीही पावती पालकांना दिली जात नाही. याबाबत मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाकडे जाब विचारल्यास ते अश्लील भाषेचा वापर करीत असल्याची तक्रारही पालकांनी नोंदविली आहे. शाळेसंदर्भात कोणतीही तक्रार केल्यास शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची किंवा नापास करण्याची धमकी देत असल्याचेही पालकांनी उपसंचालक कार्यालयात दिलेल्या निवेदनात नोंदविले आहे.
यासंदर्भात शाळेशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. शिक्षण विभागाकडे संपर्क केला असता शिक्षण निरीक्षक स्तरावर शाळांना सहली, शैक्षणिक साहित्यासाठी पालकांवर जबरदस्ती न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. पालकांच्या तक्ररीचे स्वरूप पाहून त्यानंतर यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. मात्र, शिक्षण विभागाकडून शाळांवर कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय त्यांची मनमानी थांबणार नसल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व पालक व्यक्त करीत आहेत.
माझा मुलगा पहिलीला आहे. नवी मुंबईच्या प्रथितयश शाळेत शिकतो. एप्रिलमध्ये शाळेची पहिल्या टर्मची फी भरल्यानंतर पुस्तकांविषयी विचारले असता, ही पुस्तके शाळेतूनच घेणे बंधनकारक आहे असे सांगण्यात आले. पुस्तकांचा खर्च साधारण पावणेपाच हजारांच्या घरात गेला. त्यात दोन्ही टर्मच्या वह्या होत्या. कव्हर, पेन्सील, ब्लु स्टीक या गोष्टीही घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आता पहिल्या टर्मच्या वह्या द्या आणि कव्हर बाहेरून घेतो सांगितले तर तसे नाही पूर्णच सामान घ्यावे लागेल अशी सक्ती करण्यात आली. जर असाच शाळेचा कारभार होत राहिला, तर कसे चालेल? कारण ही फी दरवर्षी वाढणारच आहे.
- आरती सोमण, पालक, नवी मुंबई
जोपर्यंत शिक्षण विभाग अशा मनमानी करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारणार नाही तोपर्यंत शाळांकडून पालकांची लूट अशीच चालू राहणार आहे. शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून शाळा पैसे उकळत आहेत. शासनाने शाळांना ठरावीक शुल्कासंबंधी नियम करून द्यायला हवेत.
- सुवर्णा कळंबे, पालक, कांदिवली
अन्य दुकानातून शाळेच्या मानाने हजार रुपयांनी स्वस्त गणवेश मिळत होता. पण शाळेने आमच्याकडूनच गणवेश घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. दोन गणवेश, मोजे असा मुलीचा गणवेश ९५० रुपयांना घेतला. मुलाचा ड्रेस ७५० रुपयांना, तर मुला-मुलींचा पीटीचा ड्रेस ७५० रुपयांना होता. शरीराच्या आकारमानाप्रमाणे गणवेशाचे दरही बदलतात, हे कळल्यावर तर धक्काच बसला.
- लीना ढमढेरे, पालक, मुंबई