शिवाईनगरचे नाव मोठे लक्षण खोटे
By admin | Published: January 13, 2015 10:30 PM2015-01-13T22:30:14+5:302015-01-13T22:30:14+5:30
म्हाडाने वेल प्लॅन्ड केलेला प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक ८ कडे पाहिले जाते. त्यामुळे या भागात झोपडपट्टीपेक्षा, इमारतींनी हा व्याप्त आहे.
अजित मांडके, ठाणे
म्हाडाने वेल प्लॅन्ड केलेला प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक ८ कडे पाहिले जाते. त्यामुळे या भागात झोपडपट्टीपेक्षा, इमारतींनी हा व्याप्त आहे. या भागातील रस्ते, पाणी आदींसह इतर मुलभूत सुविधा येथे असल्या तरी सुध्दा या प्लॅन झालेल्या शिवाई नगराच्या प्रभागात, मलनिसारण वाहिन्यांचे नियोजनच न झाल्याने इमारतींचे पाणी थेट गटारांमध्ये अथवा नाल्यांमध्ये जात आहे. मलनिसारण वाहिन्या टाकण्याचे काम पालिकेने हाती घेतले असले तरी ते अर्धवट अवस्थेत आहे. याशिवाय उपवन तलावाला पडत असलेला प्रेमीयुगलांचा विळखा यामुळे येथील जेष्ठ मंडळी नाराज आहे. विशेष म्हणजे फुटपाथ फेरीवाल्यांनी अतिक्रमीत केल्याने महिना भरात देवदया नगरमध्ये सोनसाखळी चोरीच्या ५० हून अधिक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे म्हाडाने आरक्षित ठेवलेले तीनही आरक्षण गिळंकृत झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रभाग क्र. आठ मध्ये वसंत विहारचा काही भाग, सिध्दाचल, आरपीजी कंपनी, उपवन तलाव, शिवाई नगर, मिसाळ वाडी, निळकंठ हाईट्स, लक्ष्मी नारायण, रवि इस्टेट, उन्नती गार्डन, पवार नगर, महापौर निवास आदींचा या प्रभागात समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या १९ हजार १७७ एवढी आहे. पूर्वीपासून हा वॉर्ड वेल प्लॅन म्हणून ओळखला जात आहे. म्हाडाच्या येथे ८२ इमारती असून ९५ बैठ्या चाळी आहेत. म्हाडाने या भागाचा प्लॅन करतांना गार्डन, मैदान आदींचे येथे आरक्षण ठेवली होती. त्यानुसार येथे गार्डनचे -२ आणि मैदानाचे -१ असे मिळून तीनही आरक्षणांवर अतिक्रमण किंबहुना ते गिळंकृत झाले आहेत. वाचनालय व समाजमंदिराचा अभाव असलेल्या या प्रभागात आजही मलनि:सारणाचे नियोजन योग्य पध्दतीने न झाल्याने नव्याने विकसित होत असलेल्या इमारतींचे सांडपाणी थेट गटारांमध्ये अथवा नाल्यात सोडले जात आहे. म्हाडाने तयार केलेल्या रस्त्यांची देखभाल होतांना दिसत नाही. गणेश नगर भागात तर चाळा माफीयांनी अनधिकृत चाळी उभारल्या आहेत. अनधिकृत इमारतीदेखील येथे उभारल्या गेल्या असून त्यांना मात्र पाणी आणि इतर सुविधा न मिळाल्याने येथील रहिवासी आजही चुलीवर ेस्वयंपाक करतांना दिसत आहेत.
दुसरीकडे उपवन तलावाची देखील दुरवस्था झाली असून मासुंदा तलावाप्रमाणे या तलावाचे सुशोभिकरण करुन चौपाटी तयार करण्यात यावी अशी मागणी वांरवांर केली गेली आहे. परंतु नागरिकांच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे एका बाजूला येऊरचा डोंगर आणि हिरव्या निसर्गाची चादर या तलावाच्या अवतीभवती असतांना येथे मात्र प्रेमीयुगालांचा गराडा पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास आपल्या कुटुंबासमेवत येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना येथून डोळे झाकून पदयात्रा करावी लागते. त्यात सकाळीदेखील येथे धूम स्टाईलमध्ये चालणाऱ्या दुचाक्यांमुळे जेष्ठ नागरीक हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी या जेष्ठांनी केली आहे. या सर्वात मोठी समस्या म्हणजे शिवाई नगरचा नाका, उन्नती गार्डन, देवदया नगर भागात असलेल्या फुटपाथ हा पूर्णपणे फेरीवाल्यांनी अतिक्रमीत केल्याने येथून ये जा करतांना खास करुन महिला वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. फुटपाथ चालण्यास बंद असल्याने महिला वर्गाला नाईलजास्तव रस्त्यावरुन चालावे लागते आणि येथेच त्यांचे मंगळसूत्र चोरीला जाते.