सामाजिक कार्याच्या नावाखाली दानशूरांना गंडा
By admin | Published: April 10, 2017 06:31 AM2017-04-10T06:31:58+5:302017-04-10T06:31:58+5:30
गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत मिळवून देण्याच्या बहाण्याने, अनेक दानशूर व्यक्तींना एका बंटी-बबलीच्या
मुंबई : गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत मिळवून देण्याच्या बहाण्याने, अनेक दानशूर व्यक्तींना एका बंटी-बबलीच्या जोडीने करोडो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार विक्रोळीत उघड झाला आहे. याबाबत दानशूर व्यक्तींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या बंटी-बबलीचा शोध सुरू केला आहे. अशा लोकांना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नीलेश सूर्यकांत शहा उर्फ नीलू जैन आणि त्याची पत्नी मनीषा सोरठिया अशी या आरोपींची नावे आहेत. या जोडीने विक्रोळीच्या हरियाली व्हिलेजमध्ये ‘डिव्हाइन फाउंडेशन’ आणि ब्लू २०१५ या दोन सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत. तीन वर्षांत त्यांनी अनेकांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. आरोपी नीलेश याची जैन आणि गुजराती धर्मीयांत चांगली ओळख असल्याने, त्याने अशाच लोकांना आपल्या जाळ््यात ओढून सामाजिक कार्याच्या नावाने त्यांच्याकडून करोडो रुपये उकळले आहेत. याशिवाय काही आजारी रुग्णांना अर्ध्या किमतीत घरपोच औषधसेवा देण्याच्या बहाण्याने, त्यांच्याकडूनदेखील वर्षभराचे पैसे घेऊन या जोडीने त्यांनादेखील गंडा घातला आहे.
दोन ते तीन महिने घरपोच औषधे दिल्यानंतर, गेल्या दोन महिन्यांपासून या रुग्णांना औषधे मिळणे बंद झाले. त्यामुळे त्यांनी अनेकदा या संस्थेशी संपर्क साधला. मात्र, काहीही प्रतिसाद न मिळाल्याने, काही नागरिक विक्रोळीच्या कार्यालयात गेले. तेथे गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी आणि त्याची पत्नी गायब असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील गेल्या सहा महिन्यांपासून पगारच दिला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ही बाब फसवणूक झालेल्या नागरिकांना समजताच, त्यांनी याबाबत घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यात, तसेच विक्रोळी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
तीन वर्षांत कोट्यवधी रूपयांचा गंडा
नीलेश सूर्यकांत शहा उर्फ नीलू जैन आणि त्याची पत्नी मनीषा सोरठिया अशी या आरोपींची नावे आहेत.
या जोडीने विक्रोळीच्या हरियाली व्हिलेजमध्ये ‘डिव्हाइन फाउंडेशन’ आणि ब्लू २०१५ या दोन सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत. तीन वर्षांत त्यांनी अनेकांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे.
सामाजिक कार्य करत असल्याचे सांगून फसवणूक