स्वप्नीलने वसइेचे नाव जगभरात झळकविले
By admin | Published: April 13, 2015 10:42 PM2015-04-13T22:42:29+5:302015-04-13T22:42:29+5:30
वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्या देशाकडून खेळणाऱ्या स्वप्नील पाटील यांनी वसईचे नाव क्रीडाक्षेत्रात सर्वदूर पसरवले आहे.
वसई : वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्या देशाकडून खेळणाऱ्या स्वप्नील पाटील यांनी वसईचे नाव क्रीडाक्षेत्रात सर्वदूर पसरवले आहे. अशा क्रिकेटपटूंना आपल्या देशातही चांगल्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत असे उद्गार वसईचे आ. हितेंद्र ठाकूर यांनी स्वप्नील पाटीलच्या सत्कार सोहळ्यात काढले. यावेळी भारताचे माजी कप्तान अंशुमन गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध होते.
वसईत राहणारा स्वप्नील पाटील हा नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये संयुक्त अरब अमीराती या देशाच्या संघातून खेळला. त्या निमित्त त्याचा वसईतील नवदुर्गा मित्रमंडळ या सामाजिक संस्था (चोबारे-पापडी) यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी आ. ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले, स्वप्नीलला मुंबईतून संधी मिळाली असती तर कदाचीत तो वर्ल्डकपमध्ये खेळूही शकला नसता. यापूर्वीही वसईत अनेक नामवंत क्रिकेटपटू झालेत. परंतु मी स्वप्नीलला एकच सल्ला देऊ इच्छितो तु सतत खेळत रहा, जोवर तुझ्या हातात बॅट आहे तोवर लोक तुझी दखल घेतील. म्हणून तू खेळतच राहावा अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर भारताचे माजी कप्तान अंशुमन गायकवाड म्हणाले, ज्या क्रिकेटपटूने वसईचे नाव जगभरात नेले त्याचा सत्कार होणे आवश्यक होत. मी ही १९७५ व १९७९ च्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळलो होतो. या स्पर्धेचे वेगळे दडपण असते. अशा दडपणाखाली स्वप्नीलने दक्षिण आफ्रिके विरूद्ध झळकवलेले अर्धशतक नक्कीच कौतुकास्पद आहे. यावेळी माजी महापौर राजीव पाटील, भाऊसाहेब मोहोळ आदी मान्यवरांची भाषणे झाली. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची स्वाक्षरी असलेली बॅट आ. हितेंद्र ठाकूर व सचिन तेंडुलकर यांनी पाठवलेला शुभसंदेश भाऊसाहेब मोहोळ यांच्याहस्ते देण्यात आले. व्यासपीठावर प्रभाग समिती सभापती नितिन राऊत, स्थायी समितीचे सभापती संदेश जाधव व माजी आ. डॉमनिक गोन्साल्वीस इ. मान्यवर उपस्थित होते.
(प्रतिनिधी)