मुंबई - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी अखेर सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गांधी कुटुंबातील कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाचा शोध सुरू होता. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत होऊ शकले नाही.
सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. तत्पूर्वी, काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. काँग्रेसमधील विविध गटांच्या चर्चेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, मध्य प्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, केरळमधील ए. के. अँथनी, ओमन चंडी, ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम, कॅप्टन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग अशी नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत आघाडीवर होती. पण, या नेत्यांची मात्र पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयारी नव्हती, असे सांगण्यात येत होते. तसेच कोणत्याही एका विशिष्ट नावावर पाच गटांमध्ये मिळून एकमत झाले नसल्याचे अखेर सोनिया गांधी यांनाच हंगामी अध्यक्ष करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते आणि दिवंगत मुख्यमंत्री विलाराव देशमुख यांचे चिरंजीव सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी अध्यक्षपदासाठी दोन नावे सुचवली आहेत.
रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जोत्यिरादित्य सिंधीया आणि सचिन पायलट यांचा फोटो शेअर केला आहे. तसेच, तरुण, लोकप्रिय आणि भारदस्त व्यक्तीमत्व असलेल्या या दोन नेत्यांपैकी कुणीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी योग्य नाव असल्याचे रितेशने म्हटले आहे. तसेच हे दोन्ही नेते मास लिडर असल्याचेही रितेशने लिहिले आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू असताना, रितेशने हे ट्विट केले होते. रितेशच्या या ट्विटला अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामध्ये, बहुतांश ट्विपल्सने रितेशच्या ट्विटला अनुसरुन या दोन्ही नेत्यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.