मोफत औषधे नावालाच; बाहेरच्या मेडिकलला गर्दी, रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्ण त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:40 PM2023-04-18T12:40:31+5:302023-04-18T12:40:55+5:30
Mumbai: राज्यातील सर्वच वैद्यकीय शिक्षण विभागातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयात रुग्णांना त्यांच्या उपचारावरील औषधे मोफत दिली जातात. मात्र, गेल्या काही वर्षात रुग्णालयात उपलब्ध होणारा औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे रुग्णालयात औषध उपलब्ध नाहीत.
मुंबई : राज्यातील सर्वच वैद्यकीय शिक्षण विभागातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयात रुग्णांना त्यांच्या उपचारावरील औषधे मोफत दिली जातात. मात्र, गेल्या काही वर्षात रुग्णालयात उपलब्ध होणारा औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे रुग्णालयात औषध उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना बाहेरून औषधे आणावी लागत असल्याचे चित्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जे. जे. रुग्णालयात दिसत आहे. हाफकिनमधून औषध खरेदीस होणारा विलंब याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या रुग्णालयात औषधे नावालाच मोफत असून, अनेक रुग्णांना रुग्णालयाबाहेरील मेडिकलमधून औषधे घ्यावी लागत आहे. या रुग्णालयाच्या बाहेर डझनभरापेक्षा अधिक मेडिकलची दुकाने आहेत.
औषध न मिळणे यात काही नवीन नाही
अब्दुल अहमद यांना विचारले असता त्यांना त्वचेच्या विकारावरील काही औषधे लिहून देण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, आज मला जे मलम विकत घ्यावे लागतेय किंवा सिट्रिझिनची जी गोळी घ्यावी लागतेय ती मोफत मिळत होती.
आज मला बाहेरून घेण्यास सांगितले गेले आहे. मी रुग्णालयाचा खूप जुना रुग्ण आहे. मात्र अनेकवेळा काही औषधे मिळतात, काही वेळा मिळत नाही. यामध्ये काही नवीन नाही, हे अख्ख्या रुग्णालय प्रशासनाला माहीत आहे. त्यामुळे मोफत उपचार, औषधे मिळतातच असे नाही.
कधी मिळतात, कधी नाही ही औषधे
कॅल्शियम : गरोदर महिला तसेच हाडाचे रुग्ण यांना मोठ्या कालावधीकरिता त्यांच्या सदृढ आरोग्यासाठी कॅल्शियम मिळावे म्हणून त्यांना गोळ्या दिल्या जातात. मात्र, काही वेळा या गोळ्या रुग्णालयात मिळतात तर कधी मिळत नाहीत.
सिट्रिझिन : ही गोळी अनेकवेळा रुग्णाच्या अंगावर काही रॅश वा ॲलर्जी झाली असेल तर ती देण्यात येते. या गोळीमुळे रुग्णांना बऱ्यापैकी आराम मिळतो. मात्र, ती गोळीही अनेकवेळा मिळत नाही. आजच्या रिॲल्टी चेकमध्ये ही गोळी रुग्णालयाबाहेर घेत असताना रुग्ण दिसत आहे.
ऑगमेंटीन : अनेक दिवसांपासून असलेला खोकला किंवा शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाच्या औषधांमध्ये ॲन्टीबायोटिक म्हणून ऑगमेंटीन ही गोळी घ्यायला सांगतात. संसर्गाचा प्रसार होऊ नये याकरिता विशेष करून गोळी दिली जाते. मात्र, या गोळ्यांचा तुटवडा अनेकवेळा पाहायला मिळतो.
आमच्याकडे मागील काळात हाफकिनकडून औषध खरेदीस विलंब झाल्याने औषधाचा पुरवठा होत नव्हता. मात्र आता या नवीन आर्थिक वर्षात औषधांचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जाईल. विशेष म्हणजे काही वेळा रुग्णाकडूनही मागणी होते की आम्हाला बाहेरच्या गोळ्या लिहून द्या. त्यांना रुग्णालयाच्या गोळ्या घ्यायच्या नसतात. असेही काही रुग्ण आहेत मात्र त्यांची संख्या कमी आहे. मात्र, औषध खरेदीचे नियम बदलल्यामुळे आता औषध खरेदी वेळेवर होऊन सर्व रुग्णालयात मिळतील याची आम्ही काळजी घेत आहोत.
- डॉ. पल्लवी सापळे,
अधिष्ठाता, सर जे जे रुग्णालय
या मेडिकलमध्ये कोणत्या औषधांना मागणी?
सिटी मेडिकल : या मेडिकमध्ये अनेक रुग्ण येतात. त्यामध्ये त्वचा रोगाकरिता लागणारे मलम आणि सिट्रिझिन गोळी घेताना रुग्ण दिसत होते. तसेच अनेक वेळा व्हिटॅमिनच्या गोळ्याही या ठिकाणाहून घेतल्या जात होत्या.
उमामा मेडिकल : या मेडिकलमधून संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून काही अँटिबायोटिक्सची मागणी केली जात होती. तसेच अनेक डायबेटीसवरील औषधे विलड १०० आणि मेटफोर्मीन ही औषधे घेतली जातात.