मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग काही दिवसांतच फुंकलं जाणार आहे. लोकसभेसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या समावेशाची अपेक्षा असलेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या यादीतील उमेदवारांची नावे ठरविण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज होऊ शकते. मात्र, उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बुथ कमिटीवर भर देत मार्गदर्शन केले होते. सर्वच निवडणुकांमध्ये बुथ हा भाजपाचा महत्ताचा दुआ असल्याचे दिसून येते.
निवडणुकांमध्ये मतदारसंघातील प्रत्येक बुथवर आपली यंत्रणा असली पाहिजे, प्रत्येक बुथवर कमिटी मेंबर आणि कार्यकर्त्यांनी पकड ठेवली पाहिजे, या प्रयत्नातून भाजपा काम करताना दिसून येते. आता, याच बुथ प्रमुखांना सन्मान देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाच्या बुथ प्रमुखांनी पूर्ण ताकदिनीशी मैदानात उतरावे, जनतेला भाजपाने केलेल्या कामांची माहिती देत लोकांना मतदानाचे आवाहन करावे, या अनुषंगाने बुथ प्रमुखांच्या घरावर नेमप्लेट लावण्याचा नवीन उपक्रम भाजपाने हाती घेतला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी गावातून या नेमप्लेट कॅम्पेनची सुरुवात केली आहे.
भाजपाच्या विजयी अश्वमेधाचं श्रेय बुथप्रमुखांना दिलं जातं. त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. आटपाडीतील दिघंची, लिंगीवरे, राजेवाडी, पुजारवाडी (दि.),उंबरगाव, दडसवाडी, विठलापूर बुथ प्रमुखांच्या निवासस्थानी नामफलक लावण्याचा देशातील पहिला उपक्रम राबवल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. तसेच मतदार व लाभार्थी यादीचे वाटपही करण्यात आल्याचे त्यांनी सोशल मीडियातून सांगितले आहे.
महाराष्ट्रातील यादी आज अपेक्षित
दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अपूर्ण राहिल्यामुळे या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लढलेल्या २५ जागांवर उमेदवारांची निवड होणार काय, याची उत्सुकता लागली आहे. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा नसलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.