Join us

मुंबईतील २० लाख मतदारांची नावे वगळली, भाजपाचे षड्यंत्र असल्याचा काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 4:09 AM

मुंबईतील मतदारयाद्यांतून तब्बल वीस लाख मतदारांची नावे गायब करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने झोपडपट्टीत राहणारा आणि पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात येत असून, यामागे सत्ताधारी भाजपाचे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

मुंबई - मुंबईतील मतदारयाद्यांतून तब्बल वीस लाख मतदारांची नावे गायब करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने झोपडपट्टीत राहणारा आणि पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात येत असून, यामागे सत्ताधारी भाजपाचे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबईतील मतदारयाद्यांचे तातडीने पुनर्निरीक्षण करण्याचीही मागणी काँगे्रसने केली आहे.मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, आमदार नसीम खान, आमदार असलम शेख यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेत मतदारयाद्यांचा मुद्दा उपस्थित केला. मतदारयाद्यांतून ज्या लोकांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांची नावे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली. मुंबईत हजारोंच्या संख्येने झोपडपट्टी, तसेच अन्य पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे लाखो लोक इतर ठिकाणी राहायला गेले आहेत. या बदलाची नोंद निवडणूक विभागाचे कर्मचारी वोटर व्हेरिफिकेशनदरम्यान घेत नाहीत. पत्त्यावर व्यक्ती नाही, या सबबीखाली यादीतून मतदारांची नावे वगळली जातात, असा आरोप निरुपम यांनी केला.संजय निरुपम म्हणाले, मतदारयाद्यांसोबतच निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील अन्य मुद्देही आम्ही जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केले आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी स्मार्ट कार्डचा वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. निवडणुकीला सहा महिन्यांचाही कालावधी शिल्लक राहिलेला नाही. तरीही स्मार्ट कार्ड नोंदणीचे काम पूर्ण झालेले नाही. सर्वत्र आधार कार्डची सक्ती करणारे भाजपा सरकार मतदारयाद्यांसाठी मात्र रेशन कार्डसाठी अडून बसली आहे. शासनाने रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे अगोदरच सूचित केले आहे. त्यामुळे आधार कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरावा आणि जाहिरातीतून अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, अशी मागणी निरुपम यांनी या वेळी केली. 

टॅग्स :निवडणूकबातम्या