Join us

मुस्लीम अन् दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब, मंत्री आव्हाडांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 5:13 PM

डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देसंविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. खासकरुन मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत, असा आरोपही डॉ, आव्हाड यांनी केला. 

ठाणे (प्रतिनिधी) - मुस्लीम आणि दलितांची नावे जाणीवपूर्वक मतदार याद्यांमधून कापली जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पुढीलवर्षी ठाणे महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येत आहेत. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. मुंब्रा येथे 20 ते 30 हजार मतदारांची नावे कापण्यात आलेली आहेत. त्यासाठी स्थलांतरन असा शेरा मारण्यात आलेला असला तरी सद्यस्थितीमध्ये ते मतदार त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. ही नावे गाळण्यामागे जबाबदार कोण आहे, याचा विचार केल्यास ही जिल्हाधिकार्‍यांची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत असते. म्हणून आमची मागणी आहे की, मतदार याद्यांची फेरतपासणी करावी आणि जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहेत. ते स्थलांतरन रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.  

दरम्यान, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. खासकरुन मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत, असा आरोपही डॉ, आव्हाड यांनी केला.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमुस्लीमदलितांना मारहाणमतदान