नवी मुंबईच्या मेट्रो स्थानकांना सूचवा नावे
By admin | Published: May 27, 2015 10:54 PM2015-05-27T22:54:21+5:302015-05-27T22:54:21+5:30
सिडकोने सुरू केलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील स्थानकांना नावे देण्यासाठी सिडकोने स्थानिक नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत.
वैभव गायकर ल्ल पनवेल
सिडकोने सुरू केलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील स्थानकांना नावे देण्यासाठी सिडकोने स्थानिक नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा बेलापूर ते पेंधर दरम्यान सुरू असून २०१७ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
११.१ कि. मी. च्या पहिल्या टप्प्यात एकूण ११ स्थानके समाविष्ट आहेत. यात बेलापूर टर्मिनल, आरबीआय कॉलनी, बेलपाडा, उत्सव चौक, केंद्रीय विहार, खारघर गाव, सेन्ट्रल पार्क, पेठपाडा, अमनदूत, तळोजा पाचनंद, पेंधर आदी स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांची नावे जवळ असणारे प्रसिध्द स्थळ, गाव, तसेच भौगोलिक खुणा याच्यावरून देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत. ही नावे सूचविण्यासाठी सिडकोने एक महिन्याचा कालावधी निश्चित केला आहे.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा तीन टप्प्यात होणार असून बेलापूर ते पेंधर या ११.१ कि. मी. च्या मार्गासाठी १,९८५ कोटींचा अंदाजित खर्च सिडकोच्या वतीने करण्यात येणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र आता २०१७ पर्यंत या मार्गावर निश्चित मेट्रो ट्रेन धावणार असल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा खांदेश्वर ते तळोजा ८.३५ किमीचा निश्चित करण्यात आला असून यासाठी अंदाजित खर्च १५0९ कोटी इतका आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत तिसरा मेट्रो मार्ग पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्याला जोडणार असून यासाठी अंदाजे खर्च ५७४ कोटी अपेक्षित आहे.
पहिल्या टप्प्यातील स्थानकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणाच्या हरकती व सूचना असल्यास सिडको कार्यालय सहावा मजला याठिकाणी पत्रव्यवहार करावा.
- मोहन निनावे,
जनसंपर्क अधिकारी, सिडको.