अफवा पसरविणाऱ्यांची नावे ‘मातोश्री’वर दिली- अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:41 AM2020-01-06T05:41:58+5:302020-01-06T05:42:09+5:30
आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसतानाही तशी अफवा पसरविण्यात आली.
मुंबई : आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसतानाही तशी अफवा पसरविण्यात आली. ज्यांनी हा उद्योग केला अशांची नावे मी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली आहेत, असा खुलासा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘मातोश्री’वरील भेटीनंतर केला.
कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने सत्तार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा शनिवारी दिवसभर होती. याबाबतचे वृत्त वाहिन्यांवर झळकताच शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सत्तारांची भेट घेतली होती. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सत्तार यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, असेही खैरे म्हणाले होते.
मात्र राज्यमंत्री सत्तार यांनी रविवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी अजिबात नाराज नाही. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या. याबाबतची वस्तुस्थिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे. त्यांनी उद्या पुन्हा एकदा भेटीला बोलावले आहे. सत्तार यांनी राजीनामा दिला नव्हता. असे कोणतेच पत्र पक्षाकडे आले नाही. खुर्ची गेल्यामुळे भाजप नेते दु:खी आहेत. त्यातूनच नाराजीचे दावे केले जात असल्याचा आरोप मंत्री अनिल परब यांनी केला.
अब्दुल सत्तार यांच्याकडे खातेवाटपात महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.