मुंबई : बहुचर्चित आणि तितकीच बहुप्रतिक्षित अशी विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांची यादी शुक्रवारी अखेर राजभवनावर पोहोचली असून आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ नावांची यादी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कामगार मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राजभवनात भेटून सादर केली. राज्यपालांकडे सादर करण्यात आलेल्या यादीत नेमकी कोणाची नावे आहेत, हे तिन्ही पक्षाकडून अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. मातोंडकर यांनी कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविली. मात्र त्या पराभूत झाल्या. आपल्या पराभवाचे खापर त्यांनी काही कॉंग्रेस नेत्यांवरच फोडले होते. मातोंडकर यांच्यासह नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर व चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस शिवसेनेने केली असल्याचे समजते. भाजपला सोडचिठ्ठी देऊन ज़्यांनी नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘घड्याळ’ हातावर बांधले ते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादीकडून करण्यात आली असून सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ही संधी देण्यात आल्याचे समजते. या शिवाय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, साहित्यिक यशपाल भिंगे आणि कला क्षेत्रातून आनंद शिंदे यांचीही नावे असल्याचे समजते. तर काँग्रेसकडून समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रातून रजनी पाटील आणि सचिन सावंत, समाजसेवा, क्षेत्रातून मुझफ्फर हुसेन तर कला क्षेत्रातून अनिरुद्ध वनकर यांच्या नावांची चर्चा आहे.
अशी आहेत संभाव्य नावे
शिवसेनाउर्मिला मातोंडकरनितीन बानगुडे पाटीलविजय करंजकरचंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी एकनाथ खडसेराजू शेट्टीयशपाल भिंगेआनंद शिंदे
कॉंग्रेस रजनी पाटील सचिन सावंतमुझफ्फर हुसेनअनिरुद्ध वनकर
या यादीत नेमकी कोणाची नावे आहेत, हे तिन्ही पक्षाकडून अधिकृतपणे सांगण्यात आले नाही.