Join us

‘शताब्दी’चे दोन वेळा नामकरण!

By admin | Published: January 04, 2017 4:36 AM

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणाऱ्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी श्रेयवादाची लढाई रंगली.

- मनोहर कुंभेजकर,  मुंबईमुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणाऱ्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी श्रेयवादाची लढाई रंगली. बोरीवली येथील कस्तुरबा क्रॉसरोड येथील शताब्दी रुग्णालयाच्या नामकरणासाठी आमनेसामने आलेल्या सेना-भाजपाने एकाच दिवसात रुग्णालयाचा नामकरण सोहळा दोनवेळा पार पाडला.याआधी आरोग्य समितीत मंजूर झालेल्या शताब्दी रुग्णालयाचे नामकरण ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महानगरपालिका रुग्णालय’ असे करण्यात आले होते. भाजपाने मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता रुग्णालयाचा नामकरण सोहळा आयोजित केला होता. त्याची कुणकुण लागताच शिवसेनेने सकाळी ९ वाजताच या ११ मजली इमारतीचा भूमिपूजन सोहळा सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली शिवसैनिकांमार्फत उत्साहात व घोषणाबाजीत पार पाडला. या वेळी मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेवक उदेश पाटेकर, नगरसेविका रिद्धी फुरसुंगे, नगरसेविका संध्या दोशी, शताब्दी रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुरेखा कणसे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेनेने या नामकरण सोहळ्याला भाजपाच्या नगरसेविका आसावरी पाटील यांना बोलावून घेतले; आणि त्या या नामकरण सोहळ्याला उपस्थित होत्या, अशी माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली. त्यानंतर भाजपानेही नियोजित कार्यक्रम सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घेतला. या कार्यक्रमास भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मनीषा चौधरी, नगरसेविका आसावरी पाटील उपस्थित होते. या प्रकरणी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या सर्व नामकरण सोहळ्याच्या गोंधळास पालिका प्रशासन जबाबदार असून, त्यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे होता.