मुंबई : शिक्षणमहर्षी प. म. राऊत यांच्या ८४व्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत कन्नमवार नगर-२ येथील हरिओम स्वीट जनता मार्केट, इमारत क्रमांक १७५ या मार्गाचे शिक्षण तपस्विनी ‘स्व. विद्या परशुराम राऊत मार्ग’ असे नामकरण करण्यात येणार आहे.
गुरुवार, १५ जुलै रोजी स. ११ वाजता कन्नमवार नगर, एमटीएनएल ऑफिस चौकात हा कार्यक्रम होणार आहे. माजी महापौर दत्ता दळवी, स्थानिक नगरसेवक उपेंद्र दत्ताराम सावंत हे समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या विद्या परशुराम राऊत यांना तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ मिळाला होता. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे स्थानिक नगरसेवक उपेंद्र दत्ताराम सावंत यांच्या प्रयत्नांनी नामकरण होत आहे. कन्नमवार नगरमधील सामाजिक संस्था, स्थानिक रहिवासी, हितचिंतक व पालक यांचेही पाठबळ या निर्णयास आहे. कोरोना काळाचे नियम पाळून पालिकेतर्फे हा कार्यक्रम होत आहे.