मुंबई उपनगरात नमो ११ सूत्री कार्यक्रम राबवला जाणार; मंगलप्रभात लोढा यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:10 PM2023-11-07T21:10:48+5:302023-11-07T21:15:02+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात नमो ११ सूत्री कार्यक्रम राबवणार मुंबई उपनगर ठरला प्रथम जिल्हा
मुंबई: १७ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जनहितासाठी 'नमो ११ सूत्री' कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेऊन मुंबई उपनगर जिल्ह्यात सदर कार्यक्रम राबवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. पालकमंत्री लोढा यांनी याबाबत माहिती दिली. ८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.
नमो ११ सूत्री कार्यक्रमांतर्गत मुंबई उपनगर जिल्हात पालकमंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, आदिवासी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास, क्रिडा विकास, शाश्वत विकास इ. विविध ११ विषयांवर आधारित लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील. मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, चांदिवली, अंधेरी (पश्चिम), घाटकोपर (पूर्व), वांद्रे (पूर्व), मागाठणे, मुलुंड, मालाड, कांदिवली, विलेपार्ले या ठिकाणी सदर उपक्रमांचा ८ नोव्हेंबर २०२३ रोजी शुभारंभ केला जाणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात नमो ११ सूत्री कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती
१. नमो महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कुर्ला येथील बचत गटांना आर्थिक साहाय्य देण्यात येणार.
२. नमो कामगार कल्याण अभियानांतर्गत चांदिवली येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवण्यात येईल.
३. मत्स्य व्यवसायासारख्या कृषी संलग्न व्यवसायात कार्यरत असलेल्या मच्छीमारांचे उत्पन्न दुपटीने वाढावे, याकरिता नमो शेततळी अभियानांतर्गत अंधेरी (पश्चिम) येथे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिलांना शीत पेट्यांचे वाटप करण्यात येईल.
४. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानाअंतर्गत खार (पश्चिम) येथे ऑरगॅनिक उत्पादनांसाठी विशेष बाजारपेठेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
५. दलित वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नमो दलित सन्मान अभियानांतर्गत घाटकोपर पूर्व येथे समाज मंदिर उभारण्याच्या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे.
६. नमो ग्राम सचिवालय अभियानांतर्गत पूर्णपणे सौर उर्जेचा वापर होईल, यासाठी नियोजन करण्याकरिता वांद्रे (पूर्व) येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर स्थापित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
७. वंचित घटकांना प्रगत व आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानांतर्गत मागाठणे येथील आदिवासी बहुल शाळेतील सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
८. नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत मुलूंड येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.
९. नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियानांतर्गत अंबोजवाडी, मालवणी, मालाड (पश्चिम) येथे क्रिडा मैदान विकासकामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे.
१०. नमो शहर सौंदर्यीकरण अभियानांतर्गत कांदिवली (पूर्व) येथील मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे.
११. पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यासाठी नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिराच्या परिसर सुशोभिकरणाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे.