मुंबई : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. दादर रेल्वे स्थानकातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो एक्सप्रेसला भगवा झेंडा दाखवला. मुंबई भाजपाच्या वतीने खास नमो आणि मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन नमो एक्सप्रेसमधून एकूण ३६०० प्रवासी कोकणात रवाना झाले.
कोकणवासीयांसाठी एकूण सहा ट्रेन सोडण्यात येत आहेत. कोकणवासीयांना हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवणही दिले गेले. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार. आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, आमदार मिहिर कोटेचा, महामंत्री संजय उपाध्याय, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे उपस्थित होते.
मुंबईमधून मोठ्या संख्येने चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर नमो आणि मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली आहे. गतवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली होती. त्याला कोकणवासीयांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एक्स्प्रेसचा गतवर्षी शेकडो प्रवाशांनी लाभ घेतला.