मुंबई : कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक मानले जाते. अनेक ज्येष्ठ - श्रेष्ठ कलावंतांना या नाटकाची भुरळ पडली. त्यातल्या काहींनी या नटसम्राटाचे शिवधनुष्य आपापल्या ताकदीने पेलले. याच मांदियाळीत अभिनेता नाना पाटेकर यांचे नाव समाविष्ट होणार आहे. फरक फक्त एवढाच आहे, की नाना हा नटसम्राट रंगभूमीवर नव्हे; तर रूपेरी पडद्यावर साकारणार आहे. या संहितेतील अप्पासाहेब बेलवलकर रंगवण्यासाठी या नटसम्राटाच्या नाना कळांना आता सुरुवात झाली आहे. मराठी रंगभूमीवर श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी, यशवंत दत्त, राजा गोसावी, चंद्रकांत गोखले, उपेंद्र दाते अशा काही ज्येष्ठ रंगकर्मींनी नटसम्राटला आपापले आयुष्य बहाल केले आणि अप्पासाहेबांचे व्यक्तिमत्त्व आपल्यात सामावून घेतले. ‘जगावं की मरावं’, ‘कुणी घर देता का घर’, अशी या नाटकातली स्वगतं प्रचंड लोकप्रिय आहेत आणि आता हीच स्वगतं मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. वास्तविक, नानासुद्धा हा नटसम्राट रंगभूमीवर सादर करणार होता; परंतु त्यांनी यासाठी आता रुपेरी पडदा जवळ केला आहे. या नटसम्राटचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी महेश मांजरेकर यांनी उचलली आहे. विशेष म्हणजे मराठी पडद्यावर नटसम्राट आल्यावर काही काळाने तो हिंदी चित्रपटात सुद्धा येईल, असे सूतोवाच नानाने नटसम्राट चित्रपटाच्या मुहूर्तावेळी केले़ म्हणजेच मराठमोळा नटसम्राट पुढे जाऊन हिंदी सुद्धा सादर होणार आहे. मराठी चित्रपटात नानाबरोबर रीमा, विक्रम गोखले, सुनील बर्वे, नेहा पेंडसे यांच्याही भूमिका आहेत. (प्रतिनिधी)
नटसम्राटसाठी ‘नाना’ कळा!
By admin | Published: March 02, 2015 10:56 PM