बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता आणि नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे आपल्या अभिनयामुळे सर्वपरिचीत असून त्यांचे देशात कोट्यवधी चाहते आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरु केलेलं सामाजिक काम आणि राजकीय टीपण्णीवरुनही तितकेच चर्चेत असतात. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर 'लोकमत'च्या माध्यमातून जाहीर मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची राज्यभर चर्चाही झाली. त्यानंतर, आता पुन्हा एकदा नाना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवादरम्यान नाना पाटेकर यांच्या कोकणातील घरी जाऊन गणरायाचे आशीर्वाद घेतले होते. तर, नानांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची मुलाखतही प्रचंड गाजली होती. आता, पुन्हा एकदा नाना आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली आहे. नानांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यासंदर्भात स्वत: मुख्यमंत्र्यांनी CMO अकाऊंटवरुन यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ आणि श्री गणरायाची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले. राज्य सरकारची सुरू असलेली विविध विकासकामे, नाम फाउंडेशनचे सध्या सुरू असलेले कार्य, राज्यात सिंचन आणि जलसंधारण कामांची गरज अशा अनेक विषयांवर दिलखुलासपणे चर्चा करण्यात आली, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.