Join us

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू; तनुश्री दत्ताची जळजळीत टीका  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 9:30 PM

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले.

ठळक मुद्देमंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू म्हणून जळजळीत टीका केली आहे.  आता पुन्हा या प्रकरणी १७ जानेवारी रोजी पहिली सुनावणी होईल.नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

मुंबई - नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू असल्याची जळजळीत टीका अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केली आहे. काही दिवसांपूर्वी मी टू मोहिमेंतर्गत तनुश्री दत्तानेनाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे न सापडल्याने कोर्टात बी समरी अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा या प्रकरणी १७ जानेवारी रोजी पहिली सुनावणी होईल. मात्र, मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू म्हणून जळजळीत टीका केली आहे. तनुश्री दत्ता हिने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले. निलेश पावसकर यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी मला फसवून या प्रकरणातील पुरावेही नष्ट केले. पावसकर यांनी २००५ पासून नाना पाटेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या लैंगिक शोषणाची प्रकरणे रद्द केली. तसेच नाना पाटेकर आणि मनसेचे काय संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. नाना पाटेकर यांनी त्यावेळी मनसेच्या गुंडांना बोलवून सेटवर गोंधळ घातला. त्यानंतर गणेश आचार्यने माझे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही यावेळी तनुश्री दत्ताने केला. तनुश्रीने या प्रकरणातील पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवरही बोट ठेवले आहे. पोलिसांनी अनेक पुराव्यांशी छेडछाड केल्याचे तिचे म्हणणे आहे.

त्याचप्रमाणे तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले. नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने परदेशातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या घेतल्या. मात्र, हा सर्व पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढायचे की यांचे काम झाले. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरे देणार होते, त्याचे काय झाले?, असा सवालही यावेळी तनुश्री दत्ताने केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ‘मी टू’ या चळवळीअंतर्गत केला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी २०१९ साली जूनमध्ये न्यायालयात ओशिवरा पोलिसांनी ‘बी समरी’ अहवाल सादर केला होता. तनुश्रीने नाना यांच्याविरोधात जे आरोप केले आहेत, ते सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे त्यांना सापडलेले नाहीत. त्यामुळे तनुश्रीने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. संशयित आरोपीविरोधात कोणताच पुरावा सापडला नाही की पोलीस ‘बी समरी’ रिपोर्ट न्यायालयात सादर करतात. तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांनी मात्र या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर अविश्वास दर्शवला होता. आता त्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :नाना पाटेकरतनुश्री दत्तामुंबईपोलिसमीटू