नाना पाटेकर होणार कामगार विभागाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
By admin | Published: January 2, 2015 01:50 AM2015-01-02T01:50:48+5:302015-01-02T01:50:48+5:30
कामगार कल्याण विभागासाठीदेखील त्याने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व्हावे, अशी गळ गृहनिर्माण व कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी नानाला घातली आहे.
अतुल कुलकर्णी - मुंबई
प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर आता गृहनिर्माण आणि कामगार विभागाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होणार असून, एसआरएच्या माध्यमातून बिल्डरांनी जो घोळ घातलेला आहे; त्यावर आधारित एक लघुचित्रफीतदेखील तो करणार असल्याचे समजते. शिवाय, कामगार कल्याण विभागासाठीदेखील त्याने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व्हावे, अशी गळ गृहनिर्माण व कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी नानाला घातली आहे.
१ जानेवारी हा नानाचा वाढदिवस. त्यासाठी प्रकाश मेहता नानाच्या लोखंडवाला येथील निवासस्थानी गेले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नानाने राज्यातील लाखो संघटित व असंघटित कामगारांच्या भल्यासाठी त्यांचे दूत म्हणून काम करावे, अशी विनंती मेहता यांनी नानाला केली. त्यावर त्याने या सगळ्या प्रस्तावाला होकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर बोलताना मंत्री मेहता म्हणाले, खूप दिवसांपासून आपल्या मनात हे होते. त्यासाठी आपण मंत्री झाल्यापासून प्रयत्नात होतो. राज्यात कामगारवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या कल्याणासाठीच्या विविध योजनादेखील आहेत’ पण त्यात विस्कळीतपणा आहे. या योजनांची माहिती कामगारांना व्हावी, त्यांना त्याचा थेट लाभ मिळावा हा हेतू यामागे आहे.
गृहनिर्माण विभागातर्फे एसआरएची योजना राबवली जाते. त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारच होत असल्याची प्रकरणे आजवर बाहेर आलेली आहेत. या योजनेच्या माध्यमातून बिल्डर एसआरएच्या लोकांची कशी लुबाडणूक करतो, त्यातून या योजना कशा थंड्या बस्त्यात जातात याविषयी जागृती करण्याचा हेतू नानाला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यामागे आहे. जर नियोजित वेळेत एसआरएची योजना पूर्ण झाली तर त्या योजनेत सहभागी असणाऱ्या शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र आजवर योजनाच कधी वेळेत पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे त्याचा फायदादेखील कधी या लोकांना मिळाला नाही. नेमका हा घोळ आहे तरी काय यावर एक फिल्म तयार करण्याविषयीदेखील गुरुवारी नाना पाटेकरसोबत मंत्र्यांची चर्चा झाली. लवकरच या योजनेला अंतिम स्वरूप येईल आणि त्याची अधिकृत घोषणा होईल.