सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपवाले गप्प का?; नाना पटोलेंचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 07:26 PM2021-12-14T19:26:08+5:302021-12-14T19:27:41+5:30

भाजपचे मौन मराठी बांधवांचा अपमान करणारे असून, या हल्ल्याला त्यांची मूक संमती असल्याचे द्योतक आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

nana patole asked why bjp is silent on issue of attack on marathi speakers in border areas | सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपवाले गप्प का?; नाना पटोलेंचा थेट सवाल

सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपवाले गप्प का?; नाना पटोलेंचा थेट सवाल

Next

 मुंबई: बेळगावमध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमा भागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून, मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने निषेध करण्याचे सौजन्यही दाखवले नाही. भाजपचे हे मौन मराठी बांधवांचा अपमान करणारे असून हल्ल्याला त्यांची मूक संमती असल्याचे द्योतक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत असताना त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी मध्यवर्ती एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. दळवी यांच्यावरील हल्ला हा मराठी भाषकांवरील हल्ला असून हा अपमान व मराठी भाषकांची गळचेपी महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.  

जनता दळवी व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी 

महाराष्ट्राची जनता दळवी व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. परंतु, राज्यातील भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासह एकाही नेत्यांनी या हल्याचा साधा निषेधही केला नाही याचे आश्चर्य आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसाची मते मिळावीत, म्हणून ‘मराठी कट्टा’ सुरु करता आणि मराठी भाषकांवरील सीमाभागातील हल्ल्याप्रकरणी गप्प बसता, ही दुतोंडी भूमिका मराठी लोकांच्या लक्षात आली आहे. भाजपच्या या दुतोंडी भूमिकेला आता जनता पुरते ओळखून आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

दरम्यान, कन्नड रक्षण वेदिकेच्या माध्यमातून मराठी भाषकांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. कर्नाटकातील भाजप सरकारच्या आशिर्वादाशिवाय ही गुंडगिरी होऊ शकत नाही. या दडपशाहीला वेळीच आवार घालावा व राज्यातील भाजप नेत्यांनी सीमाभागातील हल्ल्याप्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
 

Web Title: nana patole asked why bjp is silent on issue of attack on marathi speakers in border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.