मुंबई - देशातील कोरोनाच्या संकटामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम शेतकरी अन् व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. सरकारने शेतीसंदर्भातील मालाची अत्यावश्यक सेवेत वर्णी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. मात्र, बाजारात ग्राहकच उपलब्ध नसल्याने व्यापारीही शेतकऱ्यांकडून माल विकत घेत नाही. अनेकदा भाजीपाला अन् फळे यांची अत्यल्प दरात विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. भातपिकाशी संबंधित शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची अडचण पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची मागणी केली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. भातपिकाला लावणीपासून ते काढणीपर्यंत मजूरांची जास्त आवश्यकता असते. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग बंद असून या उद्योगांवर आधारित मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे, भविष्यात त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येऊ शकतो, त्या अनुषंगाने भातपिकाची उन्हाळी धान, कापणी, पावसाळी रोवणी इत्यादी कामांचा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत समावेश केल्यास आवश्यक या भागातील मजूरांना दिलासा मिळेल, तरी याबाबत तात्काळ निर्देश द्यावेत, अशी विनंतीपूर्वक मागणी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यानन, यांसदर्भात स्वत: नाना पटोले यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.